मुंबई – शिवम दुबे व रॉबिन उथप्पा यांच्या अफलातून वादळी फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल स्पर्धेच्या मंगळवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करत 215 धावांचा डोंगर उभारला. दुबे व उथप्पा हे दोघेही शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरले असले तरीही त्यांनी संघाची स्थिती भक्कम केली.
Innings Break!
A sensational 165-run partnership between Uthappa (88) and Dube (95*) guides #CSK to a total of 216/4 on the board.#RCB chase coming up shortly. Stay tuned!#TATAIPL pic.twitter.com/uOr7P60zVa
— IndianPremierLeague (@IPL) April 12, 2022
बेंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसीने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय त्यांनाच भोवला. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत सातत्याने अपयशी ठरलेल्या ऋतुराज गायकवाडने चांगली सुरुवात केली. मात्र, याही सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही व तो 17 धावांवर बाद झाला. त्याच्या जागी आलेला मोईन अलीही अपयशी ठरला. मात्र, त्यानंतर संपूर्ण सामन्याची सूत्रे उथप्पा व दुबे या जोडीने आपल्या हाती घेत बेंगळुरूच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. या दोघांनी संघाला द्विशतकी मजल मारून दिली. या स्पर्धेत संघाच्या द्विशतकी धावा दोनवेळा झाल्या.
उथप्पा व दुबे यांनी आपापली अर्धशतके थाटात पूर्ण करताना दीडशतकी भागीदारीही केली. मात्र, त्यांना शतक साकारता आले नाही. उथप्पा 50 चेंडूत 4 चौकार व 9 षटकारांची आतषबाजी करत 88 धावांवर बाद झाला.
दुसरीकडे दुबेने षटकारांची बरसात करत शतकाकडे कूच केली होती. मात्र, तो देखील शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्याने नाबाद 95 धावांच्या खेळीत 46 चेंडूत 5 चौकार व 8 षटकारांची फटकेबाजी केली. या जोडीने संघाला 20 षटकांत 4 बाद 216 धावांचा डोंगर उभारून दिला. बेंगळुरूकडून वनिंदू हसरंगाने 2 गडी बाद केले. जोश हेझलवूडने 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 4 बाद 216 धावा. (रॉबिन उथप्पा 88, शिवम दुबे नाबाद 95, वनिंदू हसरंगा 2-35, जोश हेझलवूड 1-33).