चव्हाण-गोरेंची कमराबंद बैठक

सातारा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आ.जयकुमार गोरे यांची साताऱ्यात तब्बल अर्धा तास कमराबंद बैठक झाली. दोन्ही नेते सातारा लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार खा.उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. दरम्यान, आ.गोरे यांनी साताऱ्याच्या बाबतीत भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, अद्याप माढा मतदारसंघातील भूमिका स्पष्ट केलेली नाही.

पार्श्‍वभूमीवर दोन्ही नेत्यांची बैठक झाल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली होती. खा.उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, आ.गोरे परिसरात असताना देखील पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. पत्रकार परिषद संपल्यानंतर आ.गोरे त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर चव्हाण व गोरेंची कमराबंद चर्चा झाली. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी रणजिसिंह ना.निंबाळकर यांची वर्णी लागावी, यासाठी आ.गोरे यांनी प्रयत्न केले होते. मात्र, नियुक्ती होताच निंबाळकर काही दिवसांमध्येच भाजपवासी झाले. दरम्यानच्या कालावधीत आ. गोरे देखील भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना ऊत आला. मात्र, गोरे यांनी आपण कॉंग्रेसमध्ये आहोत आणि राहणार, विश्‍वास व्यक्त केला. परंतु सातारा मतदारसंघात आपण आघाडी सोबत आहोत तर माढ्याच्या बाबतीत सांगता येणार नाही, असे विधान त्यांनी त्यावेळी केले होते. त्याच विषयावर चव्हाण व गोरेंची कमराबंद बैठक झाली.

साहजिकच बैठकीत आ.गोरे यांनी राष्ट्रवादीकडून संभाव्य धोक्‍याची माहिती दिली असणार तर चव्हाण यांनी पक्षासोबत राहण्याच्या सूचना बैठकीत केल्या असण्याची दाट शक्‍यता आहे. बैठक संपल्यानंतर दोन्ही नेते बाहेर पडले. चव्हाण आपल्या गाडीत बसले. त्यावेळी आ.गोरे पुन्हा चव्हाणांच्या शेजारी आले. त्यावेळी देखील दोघांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. परंतु जाता जाता चव्हाण यांनी आवर्जुन गोरे यांना सूचना वजा हातात हात दिला.

निर्णय आमच्यासाठी दुर्दैवी

आयोजित पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपमध्ये गेले, याबाबत चव्हाण यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर चव्हाण म्हणाले, त्यांचा निर्णय आमच्यासाठी दुर्दैवी आहे, असे एका वाक्‍यात उत्तर दिले. वास्तविक चव्हाण आणि निंबाळकर परिवाराचा स्नेह अनेक वर्षापासूनचा राहिला आहे. मुख्यमंत्री असताना त्यांनी रणजितिसिंह ना.निंबाळकर यांना कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी संधी दिली होती. त्यानंतर जिल्हाध्यक्ष करण्यासाठी देखील चव्हाण यांनी प्रयत्न केले. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर कॉंग्रेस कमिटीच्या आवारात चव्हाण यांच्या हस्ते निंबाळकरांचा जाहीर सत्कार देखील करण्यात आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.