किरण देशमुख
खटाव – सध्या बहुतांश ठिकाणी रब्बी पिकांची सुगी जवळ-जवळ संपत आली असून शेतकऱ्याला ज्वारी, गहू, हरभरा आदी धान्याची मळणी व वाळवण करण्यात व्यस्त आहेत. या कामासाठी आवश्यक असलेल्या छोट्या-मोठ्या चाळणी विकणाऱ्यांची भटकंती सुरू झाली आहे.
सुगी संपल्यानतर शेतकरी धान्याची मळणी व वाळवण करून ते निटनेटके, व्यवस्थित करून ठेवत असतात. धान्य स्वच्छ करण्यासाठी शेतकऱ्याला छोट्या-मोठ्या चाळणींची आवश्यकता भासते स्वच्छ धान्यास बाजारपेठेत भावसुद्धा चांगला मिळत असतो. शेतकऱ्याची ही निकड दूर करण्यासाठी खटाव परिसरात चाळणी व डबे बनवणारे यांची भटकंती सुरू झाली आहे. प्रत्येक वर्षी या हंगामात हे लोक येत असतात. चाळणवाले चाळणी रोख रकमेत न विकता ग्राहकांकडून गहू, ज्वारी सारखे धान्य घेणेच पसंत करतात. यातून एक प्रकारे कॅशलेश व्यवहार साधल्याचे आढळून येते व त्याच बरोबर कुटुंबाची वर्षभराची धान्याची गरज देखील भागत असते.
डबे, मापे, चाळणी बनविणारे मल्हारी घोरपडे व तायाप्पा शिंदे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की वाडवडिलांपासून हा व्यवसाय करत आहे. धंदा हंगामी असल्याने इतर वेळी उपासमारीची वेळ येते. प्रसंगी भंगारविक्री, मजूरी, शेळ्या-मेढीं पालन असे उद्योग करावे लागतात. समाजतील स्त्रिया दारोदार डोक्यावर पाटी घेऊन आरसे, कंगवे, टिकल्या, चाफ अशा वस्तू विकतात. परंतु, नवीन पिढी या व्यवसायाकडे वळत नसल्याचे त्यांनी सांगितले.