ओझर -तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी वाढत चाललेली भाविकांच्या संख्या आणि त्यांना देत असणाऱ्या सुविधा याबाबत श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट नेहमी अग्रेसर असतेच. अनेक उपक्रम भाविकांच्या सेवेसाठी देवस्थान राबवत असते. या सुविधेमध्ये वाढ करण्यासाठी देवस्थान ट्रस्टने चपाती यंत्र खरेदी केलेली आहे.
या चपाती यंत्राची किंमत तेरा लाख इतकी असून ती ताशी 1500 चपात्या केल्या जातात. या यंत्रने वेळेची बचत व प्रसादाची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे. विनायक चतुर्थीच्या मुहूर्तावर या यंत्रचे पूजन करून देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे, उपाध्यक्ष रंगनाथ रवळे, सचिव आनंदराव मांडे, खजिनदार किशोर कवडे, विश्वस्त गणेश कवडे, गणपत कवडे, कैलास घेगडे, मंगेश मांडे, कैलास मांडे, मिलिंद कवडे, दशरथ मांडे, विजय घेगडे, अजित कवडे, श्रीराम पंडित, राजश्री कवडे यांच्या उपस्थितीत यंत्र कार्यान्वित करण्यात आले. ग्रामस्थांकडून देवस्थान ट्रस्टमधील विश्वस्त मंडळाचे कौतुक करण्यात आले.
तसेच दुसऱ्याच दिवशी श्री विघ्नहर विद्यालय ओझर या शाळेतील इयत्ता दहावीचा निरोप समारंभ असल्याने या विद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना देवस्थान ट्रस्टने महाप्रसादाची व्यवस्था केल्याने पहिल्याच दिवशी चपाती मशिनच्या सहाय्याने दर्जेदार चांगली सुरुवात झाल्याने सर्व विश्वस्त मंडळाने समाधान व्यक्त केले.