पुणे : चीनमधील वुहान शहरापासून सुरू झालेल्या नवीन करोना विषाणूने अन्य देशांमध्येही थैमान घातले आहे. यापुढे वुहानमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना विलगीकरण कक्षात दाखल करून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.
त्याबाबत केंद्र शासनाने आरोग्य विभागाला आदेश दिले असून, विमानतळांवर अधिक बंदोबस्त वाढविण्यात आला असून, राज्य आणि जिल्हा स्तरावरील डॉक्टरांची यासाठी मदत घेतली जात आहे.
राज्यात आतापर्यंत विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या 106 संशयित प्रवाशांपैकी 104 प्रवाशांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. दोन प्रवाशांचे नमुने उद्यापर्यंत (दि. 29) प्राप्त होणार आहे.
दरम्यान, चीनसह हॉंगकॉंग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मलेशिया यांच्यासह इराण आणि इटलीमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरोग्य तपासणी केली जात आहे.
कोणतीही लक्षणे दिसल्यास त्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात दाखल केले जात आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.