मुंबई – 2024 च्या निवडणुकीआधी पत्रकारांनी आपल्याविरोधात एकही बातमी छापू नयेय यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा.. ढाब्यावर जेवायला न्या, अशा सूचना करतानाची भाजप (bjp) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांची ऑडिओ क्लिप (audio clip viral) व्हायरल झाली.
बावनकुळेंच्या या व्हायरल क्लिपवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी बावनकुळेंची पाठराखण केली असली तरी राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीका सुरु झाली आहे.
अश्यातच, आता भाजपा आमदार राम शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, “भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बोलण्याचा मीडियाने विपर्यास केला. त्यांच्या बोलण्याचा तसा उद्देश नव्हता.
आपण अतिथी देवो भव म्हणतो. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करणे त्याला चहा पाजणे म्हणजे ही मीडियाची न्यूज होऊ शकत नाही’ असं राम शिंदे यांनी सांगितलं.
बावनकुळेंचे स्पष्टीकरण !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात खूप चांगले काम केले आहे. तरीदेखील खूप निगेटिव्ह बातम्या येत असतात. पत्रकारांना चहा प्यायला बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे चहा प्यायला जा आणि त्यांना खरी वस्तुस्थिती सांगा.
कारण, शेवटी समाजात पत्रकारांना मोठे स्थान आहे. पत्रकार आपल्या न्यायवस्थेतील चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा, या अर्थाने मी ते विधान केले आहे, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.