मुंबई : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.या प्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे. दरम्यान पोलीस संरक्षणात असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कारवाईस सुरुवात केली आहे. अंकुश शिंदे यांनी आठ पोलीस कर्मचारी आणि तीन अधिकारी असे एकूण ११ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांनी शाई फेकली होती. त्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी सायंकाळी चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला. पाटील हे चिंचवड गाव येथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली.