मुंबई – पुण्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाई फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पाटील यांनी महापुरुषांबाबत केलेल्या विधानाच्या निषेदार्थ अज्ञातांनी हे पाऊल उचलल्याचे दिसून आले. त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील या घटनेबाबत भाष्य केले आहे.
मी या घटनेचा निषेध करतो असं अजित पवार म्हणालेत. पुण्यात एका खाजगी कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीबाबत आपले मत व्यक्त केले. पवार म्हणाले,चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,कोणी कायदा हातात घेऊ नये. मी या घटनेचा निषेध व्यक्त करतो अशा शब्दात अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पैठणमध्ये केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर पाटील यांनी याबाबत दिलगिरी देखील व्यक्त केली होती. परंतु काल पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यकर्त्याची भेट घेऊन दुसऱ्या कार्यक्रमाला निघत असताना पाटील यांच्यावर काही जणांनी शाई फेकली. त्यानंतर पोलिसांनी शाई फेकणाऱ्यांना लगेच ताब्यात घेतले होते.