पुण्याच्या पालकमंत्री पदी चंद्रकांत पाटील?

पुणे – पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट हे आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री यांच्याकडे देणार आहेत. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री कोण? अशी चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाटील यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

बापट हे खासदारपदी निवडून आल्याने त्यांना आमदार पदाचा तसेच पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानुसार मंगळवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते पालकमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्त करणार आहेत. त्यामुळे आता पुण्याचे कारभारी कोण राहणार अशी चर्चा सर्वत्र होत आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आपल्याकडे यावी, यासाठी शहरातील अनेक आमदारांनी तसे प्रयत्नही सुरू केले होते. अनेक आमदारांची नावे चर्चेत होती.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. या चार महिन्यांसाठी पुण्यातून नाव दिले तर एका आमदाराच्या पारड्यात झुकते माप दिल्यास रुसवे फुगवे होऊ शकतात. अशातच गटातटाचे राजकारण निर्माण होऊ शकते, अशी शक्‍यता धरून शहरातून पालकमंत्री न देताना बाहेरील जिल्ह्यातील मंत्र्यास पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

त्यानुसार पुण्याचे पालकमंत्री म्हणून याआधी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव चर्चेत होते. मात्र, आता महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्र्याची जबाबदारी देण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पाटील यांच्याकडे आता महसूलमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोल्हापूर आणि सांगलीचे पालकमंत्री त्याचबरोबर आता पुण्याचे पालकमंत्री ही नव्याने जबाबदारी देण्याचे निश्‍चित झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.