नवी दिल्ली: नव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर, लोकसभेच्या सभापतीपदी कुणाची निवड होणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. त्या पदासाठी मनेका गांधी, राधामोहन सिंह आणि विरेंदर कुमार या माजी केंद्रीय मंत्र्यांची नावे चर्चेत आहेत.
सत्तारूढ आघाडीतील (एनडीए) सर्वांत मोठा पक्ष असल्याने लोकसभेचे सभापतीपद भाजपला मिळणे स्वाभाविक आहे. त्या पदासाठी मनेका या स्वाभाविक पर्याय मानल्या जात आहेत. त्या सर्वांधिक आठवेळा लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. सर्वांत ज्येष्ठ सदस्य म्हणून त्यांची हंगामी सभापतीपदी निवड होणे निश्चित मानले जात आहे.
राधामोहन आणि कुमार हे दोघेही सहाव्यांदा लोकसभेचे सदस्य बनले आहेत. त्यामुळे सभापतीपदासाठीचे तेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्याशिवाय, जुअल ओराम आणि एस.एस.अहलुवालिया हे माजी केंद्रीय मंत्रीही शर्यतीत आहेत. दक्षिणेकडील एखाद्या नेत्याची सभापतीपदी निवड करण्याची खेळीही भाजप नेतृत्वाकडून केली जाऊ शकते. यावेळी उपसभापतीपद बिजू जनता दलाला (बिजद) मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास त्या पक्षाचे ज्येष्ठ खासदार भतृहरी माहताब यांची वर्णी लागू शकते. मागील वेळी अण्णाद्रमुकचे एम.थंबीदुराई यांनी उपसभापतीपदाची जबाबदारी सांभाळली.