राजीव गांधी फाउंडेशनसह तीन ट्रस्टच्या चौकशीचे केंद्र सरकारचे आदेश

नवी दिल्ली – राजीव गांधी फाउंडेशनला मिळणाऱ्या देणगीवरून वाद चालू असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तिघांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी केंद्र सरकारने  चौकशीसाठी आंतर मंत्रालयीन समिती गठित केली आहे. यामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राजीव गांधी फाउंडेशनने परदेशातून विशेषतः चीनकडून देणग्या घेताना पीएमएलए, आयकर कायदा, एफसीआरए या कायद्यातील विविध नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आंतर मंत्रालयीन समितीची स्थापना केली आहे. या समितीचे प्रमुख ईडीचे संचालक असणार आहेत.

काय आहे प्रकरण?

भारत-चीनच्या सीमा संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सातत्याने भाजपवर टीका करत आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मनमोहन सिंह यांच्या काळात २००५ मध्ये राजीव गांधी फाउंडेशनने चीनच्या दूतावासाकडून २० लाख रुपयांची देणगी स्वीकारल्याचा आरोप केला होता.

यावर भाजपच्या या आरोपांचे प्रत्युत्तर ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी अत्यंत संयमित शैलीत दिले. राजीव गांधी हे सामाजिक कार्यासाठीचे फाउंडेशन असून त्यांना लोकांकडून देणगी स्वरूपात पैसे जमा करूनच सामाजिक कार्यासाठी निधी जमवावा लागतो. तसेच पंधरा वर्षांपूर्वी या फाउंडेशनला देण्यात आलेल्या 20 लाखांच्या देणगीचा चीनने सन 2020 मध्ये केलेल्या घुसखोरीशी संबंध काय, असा सवालही चिदंबरम यांनी विचारला आहे.  त्यांनी म्हटले आहे की, “राजीव गांधी फाउंडेशन’ने घेतलेली ही कथित देणगी परत दिल्यानंतर चीन आपल्या भारतीय हद्दीतून माघारी फिरणार आहे काय? असा सवाल त्यांनी भाजपला विचारला होता. राजीव गांधी फाउंडेशनने ज्या देशी विदेशी देणग्या स्वीकारल्या आहेत त्याला सरकारची रितसर अनुमती असून त्याच्या खर्चाचे हिशेब सरकारला ऑडिट रिपोर्टद्वारे सादर केले आहेत आणि सरकारने ते मान्य केले आहेत, असेही चिदंबरम यांनी सांगितले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.