पुणे -ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या वाढत असून सुमारे 250 ग्रामपंचायत आणि नगरपालिकांमध्ये बाधित आढळून आले आहेत. यामुळे करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यामध्ये 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची नोंद करून त्यांची नियमिय तपासणी करणे यासह खोकला, रक्तदाब, डायबिटीज, दमा आदी आजार असणाऱ्या लोकांची नियमित आरोग तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असणाऱ्यांनी बाहेर प्रवास करू नये, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
ग्रामीण भागातील नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक असून त्यासाठी ग्रामपंचायतीने मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांची नोंद करून त्यांची तपासणी करणे.
यामध्ये तापमान मोजणे, पल्स रेट व ऑक्सिजन लेव्हल तपासणी करणे आवश्यक आहे. तापसदृश लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांच्या सहाय्याने त्वरीत उपचाराबाबत आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.
विनाकारण शहराकडे प्रवास करणाऱ्यांवर निर्बंध
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अनेक लोक शहरांमध्ये ये-जा करत असतात. त्यांचा प्रवास नियंत्रित करणे आवश्यक आहे. म्हणजे अशा लोकांची नोंद ठेवणे. त्यामध्ये संबंधित व्यक्तींचे नाव, कोठे जाणार आहे. जाण्याचे प्रयोजन, परत केव्हा येणार, प्रवास साधन काय आदी तपशील नोंदविण्यात यावा.
तसेच, विनाकारण शहराकडे प्रवास करणाऱ्या लोकांवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. करोनाचा रुग्ण आढळ्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे ट्रेसिंग करणे व त्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी नमूद केले.