पिंपरी – महावितरण महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत कंपनी व्यवस्थापना सोबत झालेली चर्चा निष्फळ झाल्याने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या कंत्राटी कामगारांनी आजपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये 36 जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यांतील कंत्राटी कामगारांनी सहभाग नोंदविला असून,राज्यातील सुमारे 18 हजार कंत्राटी कामगार या बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 150 कामगारांचा समावेश आहे.
विविध मागण्यांसंदर्भात तिन्ही वीज कंपनीच्या प्रतिनिधींबरोबर झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या शाश्वत रोजगार आणि अन्य विविध समस्यांना घेऊन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने आजपासून (दि. 7) राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
शहरातील पिंपरी व भोसरी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पुण्यातील रास्ता पेठ येथील महावितरणच्या कार्यालयासमोर या कंत्राटी कामगारांनी प्रशासन आणि शासनाच्या विरोधात घोषणा देऊन काम बंद आंदोलन सुरू केले. कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगाराची हमी आणि सुरक्षा कंपनीने द्यावी, चालू भरती प्रक्रियेत बदल व्हावेत भरतीमध्ये वर्षानुवर्षे रिक्त पदांवर काम करणाऱ्या अनुभवी कंत्राटी कामगारांना प्राधान्य मिळावे, अशी मागणी या वेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली.