नवी दिल्ली :- दिल्ली सरकारचा सेवा विभाग दिल्ली सरकारच्याच कक्षेत असला पाहिजे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही केंद्र सरकारने एक स्वतंत्र अध्यादेश जारी करून या सेवा स्वतःच्या ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांवरील राज्य सरकारचे नियंत्रण संपुष्टात आले आहे. आज दिल्लीच्या बाबतीत हा प्रयोग झाला आहे, उद्या अन्य राज्यांच्या बाबतीतही केंद्र सरकार हाच अधिकार वापरेल. यामुळे केंद्राच्या या अध्यादेशाला संसदेत सर्व विरोधी पक्षांनी एकजुटीने विरोध केला पाहिजे, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
केंद्राच्या विरोधात आम आदमी पक्षाने आज दिल्लीत महारॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल हेही उपस्थित होते.
रामलिला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महारॅलीला संबोधीत करताना केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारने राज्य सरकारच्या या अधिकारांवर अतिक्रमण करून दिल्लीतील नागरीकांचा अपमान केला आहे. भाजपने मला शिव्या दिल्या तरी चालतील पण मी दिल्लीकरांचा अपमान सहन करणार नाही.
केंद्रातील मोदी सरकार घटना मान्य करीत नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आदेशही मानत नाही, ही हिटलशाही आहे. हा अध्यादेश काढून मोदी यांनी मी लोकशाही मानत नाही हेच दाखवून दिले आहे. या अध्यादेशामुळे दिल्लीवर आता दिल्लीच्या नागरीकांचाच अधिकार राहिलेला नाही.
नायब राज्यपाल हेच दिल्लीचे मालक झाले आहेत.
या लढ्यात दिल्लीची जनता एकटी आहे, असे समजू नका. मी यासाठी देशभर दौरा करून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटत आहे. त्यांनी आपल्याला पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे, असे ते म्हणाले.
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारला काम करू न देण्यासाठी त्यांनी सत्येंद्र जैन आणि मनिष सिसोदियांना तुरूंगात टाकले आहे. पण आमच्याकडे असे शंभर सिसोदिया आणि सत्येंद्र जैन आहेत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मोदी गुजरातचे 21 वर्ष मुख्यमंत्री होते, मी गेली आठ वर्ष मुख्यमंत्री आहे. आमच्यातील जनतेसाठी कोणी जास्त काम केले असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. आम्हाला प्रत्येक कामात अडथळा आणला गेला. पण आम्ही त्यावर मात करून कार्यरत राहिलो. मोदींना गुजरातमध्ये पूर्ण मोकळीक असताना त्यांना तेथे काही काम करून दाखवता आले नाही, असा आरोपही त्यांनी केला.