Arvind Kejriwal – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्यात अद्याप न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळाला नसतानाच त्यांना आज आणखी एक झटका बसला आहे. केजरीवाल यांचे खासगी सचिव विभव कुमार यांच्या विरोधात कारवाई करत सतर्कता आयोगाने त्यांना पदावरून हटवले आहे. ईडीने त्यांची सोमवारी चौकशी केली आहे. त्याच सुमारास त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
विभव कुमार यांची नियुक्ती योग्य नसल्याचे व्हिजिलन्स विभाग अर्थात सतर्कता विभागाचे म्हणणे आहे. या विभागाचे विशेष सचिव वायव्हीव्हीजे राजशेखर यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार विभव कुमार यांची तत्काळ समाप्त करण्यात आली आहे. विभव कुमार यांच्या नियुक्तीच्या वेळी निर्धारित प्रक्रियेचे आणि नियमांचे पालन केले गेले नसल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे.
दरम्यान, सोमवारी पीएमएलएच्या नियमांनुसार विभव यांचा जबाब ईडीने नोंदवून घेतला होता. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाशी संबंधित तो नोंदवण्यात आला होता. विभव यांचा मोबाइल क्रमांक चार वेळा बदलण्यात आला असल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे.
ईडीने त्यांच्या घरावरही छापा टाकला होता व त्यावेळी तब्बल १६ तास ही छापेमारी सुरू होती. तेंव्हाही केजरीवाल यांनी या छाप्यांवर विरोध दर्शवत हा राजकीय सूडाचा भाग असल्याचा आरोप केला होता. । Arvind Kejriwal | Bibhav Kumar