पुणे -अननसाची वाहतूक करत असल्याचे भासवून गांजाची तस्करी केली जात असल्याचा प्रकार डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्युव्ह इंटेलिजन्सच्या (डीआरआयच्या) पुणे पथकाने उघडकीस आणला. यावेळी पथकाने 1 हजार 878 किलो म्हणजे तब्बल पावणे चार कोटींचा गांजा पकडला. यावेळी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
विलास पवार, अभिषेक घावटे, विनोद राठोड, राजु गोंधवे, श्रीनिवास पवार आणि धर्मराज शिंदे (रा. महाराष्ट्र आणि तेलंगना) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. डीआरआच्या पुणे पथकाला दोन वाहनांमध्ये गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यातील एक वाहन ट्रक तर दुसरे मारुती सियाज कार असल्याचे समजले.
गुरुवारी (15) पुणे-सोलापूर रस्त्यावरून येणाऱ्या ट्रकला व कारला डीआरआय पथकाने ससून रुग्णालयाजवळी जीएसटी कार्यालयाजवळ थांबविले. सुरुवातीला ट्रकची तपासणी केली असता त्या ट्रकमध्ये तपास पथकाला अननसाने भरलेला ट्रक आढळला. त्यानंतर अननस बाजूला काढून पाहिले असता त्याखाली गांजाने भरलेली 40 पोती सापडली.