नगर -शालेय शिक्षक व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन हिरावून घेणाऱ्या 10 जुलै ची अधिसूचना रद्द करुन, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व शासनाचे 100 टक्के अनुदान मिळालेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन जि.प. माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांना देण्यात आले. यावेळी समन्वय समितीचे बाबासाहेब बोडखे, महेंद्र हिंगे, बबन शिंदे, दिलीप रोकडे आदी उपस्थित होते.
शासनाच्या सेवेत 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना 1982 ची पेन्शन योजना लागू आहे. त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन म्हणजे डीसीपीएस ही योजना लागू करण्यात आली आहे. शासनाच्या सर्व विभागातील 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना 1982 ची पेन्शन योजना लागू आहे. मात्र, 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी 100 टक्के अनुदान नसल्याचे सांगत शासन कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन हिरावून डीसीपीएस योजना लागू करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले.