सिंहगड रस्ता, धनकवडी, बिबबेवाडी नवे “हॉटस्पॉट’
पुणे – मध्य-पूर्व, उत्तर, पश्चिम भागापाठोपाठ आता शहराचा दक्षिण भाग करोनाचा नवा “हॉटस्पॉट’ झाला आहे. शहरातील एकूण सक्रिय करोना बाधितांमध्ये सर्वाधिक 1490 जण धनकवडी-सहकारनगर हद्दीत असून, बिबवेवाडी-943, तर सिंहगड रस्ता हद्दीतही 910 सक्रिय बाधित आहेत.
पहिल्या टप्प्यात पूर्वभागातील भवानी पेठ आणि परिसर, तसेच उत्तरेकडील कळस-धानोरी-येरवडा परिसरांत करोनाचे बाधित लक्षणीय वाढले. एप्रिल मध्यापर्यंत हा ट्रेन्ड कायम होता. एप्रिलअखेरीस ही साथ शिवाजीनगर, कसबा-विश्रामबागवाडा, नगररस्ता भागांत पसरली.
त्यानंतर दि.18 मेपासून पहिले, तर दि. 3 जूनपासून आणखी लॉकडाऊन शिथिल झाल्याने शहरात पहिले अडीच महिने अवघे 30 ते 45 बाधित असलेल्या औंध-बाणेर, कोथरूड- बावधन आणि वारजे- कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता परिसरात करोना बाधितांचा आकडा वाढीस लागली. तर, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ही साथ सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज- कोंढवा, बिबवेवाडी परिसरात पसरली आहे.