Arvind Kejriwal Tihar Jail: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना 15 एप्रिलपर्यंत तिहार तुरुंगात राहावे लागणार आहे. यानंतर त्यांच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. अशा परिस्थितीत अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगातून सरकार चालवू शकतील का, हा मोठा प्रश्न आहे. जेल मॅन्युअल काय म्हणते, कारागृहात कैदी सरकारी काम करू शकतो का? याबाबत माहिती जाणून घेऊया..
जेल मॅन्युअल काय म्हणते?
तिहार जेल मॅन्युअल आणि दिल्ली तुरुंग कायदा 2000 नुसार, अरविंद केजरीवाल जेलमधून सरकार चालवू शकतात. मात्र यासाठी त्यांना न्यायालय आणि उपराज्यपालांची परवानगी मिळवणे गरजेचे आहे. मात्र, राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, दिल्लीचे सरकार तुरुंगातून चालवता येणार नाही. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना तिहार जेलमधून सरकार चालवणे अवघड झाले आहे.
तिहार तुरुंगाशी संबंधित सूत्रानुसार, अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही कामासाठी आधी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. त्यासाठी ते त्यांच्या वकिलामार्फत परवानगी घेऊ शकतात. त्यांनी कोणत्याही फाईलवर सही करायची की नाही हे सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून असेल.
दरम्यान, केजरीवाल यांना तुरुंगातून सरकार चालवण्याची परवानगी मिळाल्यास त्यांना फोन, इंटरनेट, टीव्ही यांसारख्या सुविधा पुरवल्या जाऊ शकतात. जेल मॅन्युअलनुसार, कोणत्याही कैद्याला भेटायला येणाऱ्या 10 लोकांची नावे द्यावी लागतात. हे लोक जेल प्रशासनाला फोन करून भेटीची वेळ घेऊ शकतात. या लोकांना आठवड्यातून दोनदाच भेटता येते. तेही फक्त अर्धा तास.
तिहारमध्ये अरविंद केजरीवाल यांचा दिनक्रम कसा असेल?
इतर कैद्यांसह केजरीवाल यांचा दिवस सकाळी 6.30 वाजता सुरू होईल. यानंतर त्यांना नाश्ता दिला जाईल. ज्यामध्ये चहा आणि ब्रेड असेल. यानंतर केजरीवाल कायदेशीर टीमसोबत बैठक घेऊ शकतील. दुपारचे जेवण सकाळी 10.30 ते 11 या दरम्यान असेल. यामध्ये त्यांना डाळ, रोटी, भाजी आणि भात दिला जाणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांना त्यांच्या कक्षातच राहावे लागणार आहे.
संध्याकाळी 3:30 वाजता नाश्ता दिला जाईल. ज्यामध्ये एक कप चहा आणि दोन बिस्किटे दिली जातील. यानंतर ते दुपारी ४ वाजता वकिलांना भेटू शकतात. सायंकाळी साडेपाच वाजता रात्रीचे जेवण दिले जाईल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत कैद्यांना आपापल्या कारागृहात बंद होतील.
केजरीवाल यांना टीव्ही पाहण्याची परवानगी दिली जाईल. ते बातम्या, मनोरंजन आणि क्रीडासह 18 ते 20 चॅनेल पाहू शकतात. केजरीवाल यांना मधुमेह आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या वकिलाने आजार लक्षात घेऊन विशेष आहार घेण्याची विनंती केली आहे. केजरीवाल आठवड्यातून दोनदा कुटुंबीयांनाही भेटू शकतात.