केक अंगाला माखून धांगडधिंगा प्रथा

इंदापूर, बारामती तालुक्‍यातील चित्र : सेलिब्रेशन विघातक मार्गावर

– गोकुळ टांकसाळे

भवानीनगर – वाढदिवस साजरा करण्याचे ट्रेंड आता शहरानंतर ग्रामीण भागात रुळला आहे. तरुणांनी वाढदिवसाचा केक कापून खाण्याच्या जागी सर्व अंगाला माखण्याची नव्याने पद्धत काढली आहे. त्यात आनंदाने केक भरविण्यात जी मजा मित्र व नातेवाईकांना यायची. तीची जागा अंगाला केक माखून धांगडधिंगा करण्यात घेतली जात आहे. सध्या वाढदिवस करणे ही पॅशन झाली आहे. ग्रामीण भागात आता अंगवळणी पडलेली तरूणाई अग्रेसर झाली आहे. इंदापूर, बारामती तालुक्‍यात हे चित्र सर्रास दिसत आहे.

कोणत्याही तरुणाचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्याचे सहकारी मित्र भलामोठा केक खरेदी करतात. परंतू तो केक कापला गेला की केक त्या तरुणाला भरविण्यापेक्षा त्याच्या संपूर्ण तोंडाला माखला जातो. नक्‍की ही प्रथा कोणी आणली हे कोणालाच माहित नाही. मात्र, सध्या हीच प्रथा ग्रामीण भागात तरूणाईच्या अंगवळणी पडली आहे. वाढदिवस साजरा करताना हे चित्र सर्रास पाहावयास मिळत आहे.

शहरी भागातील मुलांचे अनुकरण हे ग्रामीण भागातील मुले करताना दिसत आहे. ग्रामीण भागातील मुलेही महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शहराचा रस्ता धरतात. त्याच वेळी शहरातील वातावरणात ही तरूणाई मिसळून जाते. तेथील अनुकरण गावातही सुरू केले जात आहे. सध्या हा प्रकार घडत आहे. गावातही कोणाचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर याच पद्धतीने साजरा केला जात आहे.

घरातील आई व आजीने ओवाळून आरती करून पुढील नवीन जीवनाच्या शुभेच्छा द्यायच्या, या जुन्या पद्धतीला बगल दिली जात आहे. ही नवीन प्रथा रूढ केली जात आहे. यातून अनेक नवे नवे प्रकार करून वाढदिवसाचे केक कापले जात आहेत. कोण भर चौकात स्टंट करून केक कापत आहे. कोण दुचाकीवर, तर कोण तलवारीने, तर कोण मोठ्या चाकूने केक कापत आहे. सध्या मी कोण आहे, मी कसा आहे, माझी ताकद काय आहे, याबाबत परिसरातील तरुण गोळा करून ताकद दाखविण्याचेच काम वाढदिवसानिमित्त आवर्जून दाखवले जात आहे. ग्रुप तयार करून यातून एकमेकांची खुन्नस काढली जात आहे.

राजकीय शक्‍तीप्रदर्शनाची झालर
1985 पूर्वी शहरी संस्कृतीत वाढदिवस साजरा करण्याचा फंडा रूजला होता. त्यानंतर वाढदिवसाची पाश्‍चात्य संस्कृती हळूहळू रूजू लागली. 1990 नंतर ग्रामीण भागात वाढदिवस साजरा करण्याकडे थोडासा कल दिसू लागला. सन 2000 नंतर वाढदिवसाची जागा हॉटेलमध्ये घेतली गेली. गेल्या 10 ते 12 वर्षांत वाढदिवस हा भरचौकात हिोऊ लागला. यातून राजकीय झालर दिसून येऊ लागली. सध्याच्या काळात समाजातील मुले परंपरा बाजूला ठेवत विघातक दिशेने फरफटत चालली आहेत. चांगली दिशा शोधण्याचा प्रयत्न न करता वाईट मार्गाचा अवलंब करून आपले पुढील आयुष्यही धोक्‍यात घालत आहेत. हेच तरुणांनी ओळखून अगदी साधेपणाने व समाजपयोगी काम कसे आपल्या हातून घडेल, याचा विचार करण्याची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.