चिंबळी (वार्ताहर) – कुरूळी (ता. खेड) येथील ग्रामदैवत असलेल्या श्रीभैरवनाथ महाराज व श्री खंडोबा महाराज उत्सवानिमित्त दि. 1 व 2 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने सांगण्यात आले.
कुरूळी (ता. खेड) येथे उत्सवानिमित्त भैरवनाथ महाराज व खंडोबा महाराज मंदिरासह सर्व मदिरांना भव्य विद्युत रोषणाई मंडप उभारण्यात आला आहे. बुधवारी (दि. 1) पहाटे मंदिरात 4 ते 6 श्रींची आरती काकड आरती, 7 ते 9 महापूजा, अभिषेक व आरती, सकाळी 9 ते 11 देवास हारतुरे व मांडव डहाळे, दुपारी 12 वाजता श्रींची महाआरती, 4 वाजता देवाचे 12 गाडे ओढण्यात येईल.
रात्री 10 ते 11 श्रींची पालखी मिरवणूक व शोभेच्या दारूची आतिषबाजी व त्यानंतर करमणुकीसाठी विठाबाई भाऊ (मांग) नारायणगांवकर यांचा लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला आहे. गुरूवारी (दि. 2) सकाळी 9 वाजता लोकनाट्य तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम होऊन दुपारी 4 ते 7 भव्य निकाली कुस्तीच्या स्पर्धेत आयोजन करण्यात आले आहे.
यासाठी 101 ते 10001 हजार रुपयांपर्यंत रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. रात्री 8 वा करमणूकीसाठी गौरी पुणेकर प्रस्तुत जल्लोष लावण्यवतींचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.