पिंपरी – किवळे ते सांगवी फाटा या रस्त्यावर कस्पटे वस्ती ते काळेवाडी फाटा दरम्यान महापालिकेतर्फे ग्रेडसेपरेटर उभारण्यात येणार आहे. प्रस्तावित ग्रेडसेपरेटरचे बांधकाम करण्यासाठी प्राधिकरण क्षेत्रातील मध्यवर्ती सुविधा केंद्र व खुल्या जागेचे क्षेत्र महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक फेरबदल करण्यासाठी नागरिकांनी महिनाभरात हरकती व सूचना द्याव्यात, असे प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेकडून ग्रेडसेपरेटर उभारण्यासाठी 23.58 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. मात्र, जागेचा ताबा मिळणे बाकी असल्याने सध्या निविदा प्रक्रिया थांबविली आहे. आवश्यक जागेचा ताबा मिळाल्यानंतर हे बांधकाम दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान, ग्रेडसेपरेटरच्या बांधकामासाठी प्राधिकरणाच्या क्षेत्रातील पेठ क्रमांक 39 व वाकड मध्यवर्ती सुविधा केंद्र येथील वाकड सर्व्हे क्रमांक 209 व 210 मधील 24 मीटर रुंद विकास योजनेतील रस्त्याच्या (पश्चिमेलगत) जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे.
ही जागा प्राधिकरणाच्या सुधारित विकास योजनेनुसार मध्यवर्ती सुविधा केंद्राची व खुली जागा आहे. हे क्षेत्र प्रधिकरणाच्या विकास योजनेनुसार 24 मीटर रूंद रस्त्याव्यतिरिक्त आहे. प्राधिकरणाच्या विकास योजनेमध्ये रस्त्याच्या आखणीलगत वाढीव रस्ता बदलाचा समावेश करण्यासाठी प्राधिकरणाच्या 17 नोव्हेंबर 2018 मध्ये झालेल्या सभेत मंजुरी देण्यात आली. या फेरबदलाबाबत आता नागरिकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या असून महिन्याचा कालावधी दिला आहे.
महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या ग्रेडसेपरेटरसाठी प्राधिकरणाकडून काही जागेचा ताबा मिळणार आहे. जागेचा ताबा मिळणे बाकी असल्याने याबाबतची निविदा प्रक्रिया थांबविली आहे.
– श्रीकांत सवणे, सह-शहर अभियंता, महापालिका.