पुणे – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे नोव्हेंबर 2023 मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीए इंटरमिजिएट आणि सीएच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. सीए अंतिम निकालात जयपूरचा मधुर जैन देशात प्रथम क्रमांक मिळविला, तर सीए इंटरमिजिएट परीक्षेत जय देवांग जिमुलिया याला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे.
सीए अंतिम परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. अंतिम परीक्षेला ग्रुप एकमधून ६५ हजार २९४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६ हजार १७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्णाची टक्केवारी ९.४६ आहे. तसेच ग्रुप दोनमधून १३ हजार ५४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी २१.६ आहे. दोन्ही ग्रुपचा निकाल ९.४२ टक्के इतका लागला आहे.
सीए अंतिम निकालात मधुर जैन हा ७७.३८ टक्के गुण मिळवून पहिला, तर मुंबईतील संस्कृती पारोलिया हिने ७४. ८८ टक्के गुण मिळवत देशात दुसरा क्रमांक आणि जयपूर येथील टिकेंद्र सिंगल आणि ऋषी मल्होत्रा यांनी ७३. ५५ टक्के गुण मिळवत संयुक्तपणे तिसरा क्रमांक मिळवला आहे.
सीए इंटरमिजिएट परीक्षेच्या पहिल्या ग्रुपचा निकाल १६.७८ टक्के, तर ग्रुप दोनचा निकाल १९.१८ टक्के आणि दोन्ही ग्रुपचा निकाल ९.७३ टक्के लागला आहे. या परीक्षेत जय जुमुलिया याने ८६.३८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, तनय भगेरियाने 86 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि ऋषी मेवावाला याने 83.50 टक्के गुण मिळवत देशात तृतीय क्रमांक पटकावला आहे. सविस्तर निकाल आयसीएआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.