कापूरहोळ, दि. ९ (वार्ताहर) – नसरापूर ग्रामपंचायतीने दिव्यांग कल्याण निधीमध्ये अनियमितता करून १८ दिव्यांग लाभार्थींना लाभापासून वंचित ठेवले आहे. नसरापूर ग्रामपंचायतीच्या अधिकारी आणि पदाधिका-यांनी २०१४-१५ ते २०२२-२३ या कालावधीतील ३ लाख ६४ हजार ९९२ रुपयांच्या निधीचा लाभ दिव्यांगाना दिलाच नाही, तर कागदी घोडे नाचवत आणि वरिष्ठांच्या मार्गदशनाचे नावाखाली वेळकाढूपणा केला असून, वरिष्ठ अधिकारी कनिष्ठांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे. अशा कामचुकार अधिका-यांवर गुन्हे दाखल करून शासकीय नियमानुसार कारवाई करण्याची मागणी सोमनाथ उकिरडे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य शासन निर्णय २५ जून २०१८ मधील मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतीच्या एकूण स्व-उत्पन्नातील दिव्यांगांच्या विकासासाठी ३ टक्के, ५ टक्के निधी दिव्यांग लाभार्थीच्या वैयक्तिक व सामूहिक कल्याणासाठी १०० टक्के खर्च करणे बंधनकारक आहे, तसेच लेखासहिता २०११ ला अधिन राहून हा खर्च पूर्ण करणे अपेक्षित आहे; परंतु नसरापूर ग्रामपंचायतीने २०१४-१५ ते २०२२-२३ या कालावधीत ३ लाख ६४ हजार ९९२ इतका निधी कमी खर्च केला आहे.
या निधी खर्चाबाबत वेळोवेळी शासकीय लेखापरीक्षणात त्रुटी दाखविल्या असताना ग्रामपंचायत अधिकारी आणि पदाधिकारी यांनी टोलवाटोलवी करून दिव्यांगांना न्याय हक्कापासून वंचित ठेवले आहे. याबाबत नसरापूर (ता. भोर) येथील सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ उकिरडे यांनी २०२१ पासून या बाबीचा पाठपुरावा केला असता ही सत्य स्थिती उजेडात आली आहे.
“नसरापूर ग्रामपंचायतीकडे दिव्यांगांच्या निधीचा खर्चाची माहीती २०२१ पासून विचारत असून, त्याला शासकीय कर्मचा-यांनी टोलवाटोलवी करत २०२३ साल उजाडले. वेळेवर माहिती तर दिली नाहीच, केवळ कागदी घोडे नाचवत वेळकाढू धोरण अवलंबले आहे.” – सोमनाथ उकिरडे, सामाजिक कार्यकर्ते, नसरापूर
ग्रामपंचायतीला निधी देण्याच्या सूचना
भोर तालुका गटविकास अधिकारी किरणकुमार धनवडे यांनी दि. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन २०१४ ते २०२३ या कालावधीतील दिव्यांग निधीची माहीती घेऊन ३ लाख ६४ हजार ९९२ इतका निधीचा अनुषेश बाकी असल्याचे कबुल केले असून, हा निधी नियमानुसार खर्च करण्याच्या सुचना नसरापूर ग्रामपंचायतील दिल्या आहेत.
“२०१४-१५ पासुन ते २०२२-२३ या कालावधीतील दिव्यांगांना ३ आणि ५ टक्के वैयक्तिक लाभाचा निधी तत्कालिन आणि विद्यमान कार्यकारी पदाधिका-यांच्या निर्णयानुसार खर्च करण्यात आला असून, उर्वरीत सार्वजनिक स्वरूपाचा लाभाचा निधी खर्च करणे अद्याप बाकी आहे. हा निधी खर्च करण्याबाबत विद्यमान कार्यकारी पदाधिकारी मासिक सभेत निर्णय घेऊन मार्च २०२४ च्या आत खर्च करणार आहे.” – विजयकुमार कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी, नसरापूर