नवी दिल्ली – गेल्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) अभ्यासक्रमात केलेल्या बदलानंतर नोंदणी वाढली आहे. सहा महिन्यांत १.२९ लाख विद्यार्थ्यांनी नवीन सीए अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली आहे.
नवीन अभ्यासक्रमासह प्रथमच या विद्यार्थ्यांची परीक्षा जून २०२४ मध्ये होणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ सहा महिन्यांतच झाली आहे. नवीन अभ्यासक्रमासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नोंदणी सुरू झाली होती.
डिसेंबर २०२४ साठीची नोंदणी बाकी आहे. नवीन अभ्यासक्रम लागू होण्यापूर्वी वर्षभरात २ लाखांवर नोंदणी झाली होती. आयसीएआयच्या २०२२ च्या अहवालानुसार, २०१३ ते २०२२ या कालावधीत सीए अभ्यासक्रमांसाठी नोंदणीत ३० टक्के घट झाली आहे.
२०१३ मध्ये ३.११ लाख विद्यार्थी नोंदणीच्या तुलनेत २०२२ मध्ये नोंदणी २.२४ लाखांवर आली होती. सध्या देशात सुमारे ४ लाख पात्र सीए आहेत. देशाची अर्थव्यवस्था ४ ट्रिलियन डॉलर्सची आहे. २०४७ मध्ये ती अंदाजे ३० ट्रिलियन रुपयांची होईल.
ती हाताळण्यासाठी ३० लाख सीए लागतील. आयसीएआयचे अध्यक्ष रजनीश अग्रवाल म्हणाले, एक लाख कोटींच्या वाढीसाठी सरासरी एक लाख सीए आवश्यक आहेत.
‘इच वन टीच वन’ योजना
विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी ‘इच वन टीच वन’ योजना सुरू केली जात आहे. यामध्ये देशभरातील सर्व ४ लाख सीए एका सीए विद्यार्थ्याला दत्तक घेऊन मदत करतील.
उत्तर-पूर्व आणि जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांनाही शुल्कात ७५ टक्के सूट देण्यात आली आहे. त्याच वेळी, ५ वर्षांसाठी सध्याचे एकूण ७५ हजार रुपये शुल्कदेखील जगातील कोणत्याही लेखा संस्थेपेक्षा स्वस्त आहे.
संख्या वाढण्याची कारणे
अभ्यासक्रम पूर्ण करण्याची वेळ साडेचार वर्षांवरून ३.५ वर्षे केली.
फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि फायनल या योजनेतून अनेक पेपर हटवण्यात आले.
एथिक्सव्यतिरिक्त, एआय, डेटा सायन्स आणि ब्लॉकचेनसारखे नवीन तांत्रिक विषय जोडले गेले.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तीन वर्षांची अनिवार्य आर्टिकलशिप दोन वर्षांपर्यंत कमी करण्यात आली.