मांजरी – चार्टर्ड अकाऊंट्स अर्थात सीएचा अंतिम परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत हर्षदा संजय शेवाळे आणि सुरज श्याम शेवाळे या चुलत बहिण-भावानं उत्तुंग यश मिळवलं आहे. सीए सारख्या अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेतील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळं हे दोघेही परिसरात चर्चेचा विषय बनले आहेत. ग्रामस्थ ,नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून या शेवाळे बहीण-भावांवर कौतुकाचा वर्षांव होत आहे.
माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांनी या दोघांचेही विशेष कौतुक केले आहे.हर्षदा आणि सुरज यांचे शेवाळे हे सदन कुटुंब सर्व काही उपलब्ध असतानाही त्या मोहाला बळी न पडता या दोनही चुलत बहीण-भावांनी शालेय जीवनातच सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढे तसे प्रयत्न केले. इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त करून सीएचा अभ्यास केला.
यात कोरोना महामारी, कुटुंबातील तीन सदस्यांचे आजारपण आणि त्यानंतर त्यांचे झालेले निधन त्यात काहीशा वेळ त्यांना द्यावा लागल्याने केवळ अवघ्या एक-दोन गुणांनी दोन वेळेच्या अपयशाला या दोघांनाही सामोरे जावे लागले. परंतु सीए व्हायचंच ही मनाशी बांधलेली खूणगाठ हर्षदा आणि सुरज या बहीण भावाला स्वस्थ बसू देत नव्हती. खासगी शिकवणीतून आणि पालकांकडून मिळणारे मार्गदर्शन याशिवाय दररोज १४ तास अभ्यास करून अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले. सीएच्या परीक्षेत हर्षदा शेवाळे हिला ४१८ तसेच सुरज शेवाळे यांना ४२४ गुण मिळाले आहेत. आपण शालेय जीवनात असताना स्वतःहून ठरवलेले ध्येय आज पूर्ण होताना मोठा आनंद होत असल्याचे हर्षदा आणि सुरज यांनी सांगितले.
हर्षदाने सांगितला अभ्यास कसा केला?
भावासोबत आपण शाळेपासून ‘सीए’पर्यंतचा अभ्यास कसा केला हे सांगताना हर्षदा सांगते, “माझा चुलत भाऊ सुरज आणि मी शाळेपासून एकत्र शिकत आहोत. आम्ही IPCC आणि CA च्या अंतिम परीक्षेसाठी एकत्रच अभ्यास केला. वडिलांनी आम्हांला अभ्यास करण्यासाठी लागणारी योग्य वेळ आणि मोबाईल पासून दूर राहण्याचा सल्ला कायम दिला .तो आम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवला.आमची अभ्यास करण्याची पद्धत सोपी होती. आम्ही एकमेकाला अभ्यासात मदत करायचो पण जास्तीत जास्त एकमेकाच्या अभ्यासाची समिक्षा करायचो.
खासगी शिकवणी , पालक संजय शेवाळे, श्याम शेवाळे, भारती शेवाळे ,मोहिनी शेवाळे एकूणच कुटुंबातील सर्व सदस्य वेळोवेळी आम्हांला मार्गदर्शन करायचे जेव्हा आम्ही प्रश्नपत्रिका सोडवायचे तेव्हा सुरज माझी उत्तरं तपासायचा तसेच मी त्याची उत्तरं तपासत होते. जेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी व्हायचा तेव्हा माझे वडील,आई व भाऊ आणि कुटुंबातील सर्वजण आम्हाला पाठिंबा द्यायचे आणि त्यानंतर आम्ही दोघेही पुन्हा अभ्यासात सक्रीय व्हायचे.”
दोन्ही मुलांच्या यशाचा आम्हांला आनंदच झाला आहे. सोशल मीडियाच्या काळात मोबाईल पासून दूर राहून अभ्यास करणे आवश्यक आहे. आज आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यायचे असेल तर पालकांनी कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी लागेल. मुलांवर चांगले संस्कार करून त्यांना चांगला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. – संजय शेवाळे, पालक.