Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गाववरील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २६ प्रवाशांच्या मृतदेहावर आज सकाळी बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या विषयीची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ‘डीएनए’ चाचणीचे काम सुरू असले तरी ते जिकिरीचे आहे. यामुळे बहुतेक नातेवाईकांच्या सहमतीने सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गिरीश महाजन तळ ठोकून होते. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मृतांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. तसेच संपूर्ण यंत्रणा कामाला लावली. यानंतर त्यांनी, ‘फॉरेन्सिक टीम’ने सलग २४ तास काम केले तरी ‘डीएनए’चा अहवाल यायला ५ दिवस लागतील. मात्र जळालेले मृतदेह एवढे दिवस ठेवता येणार नाही. त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांच्या सहमतीने अंत्यसंस्काराचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. रविवारी सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्याचे नियोजन आहे.
सर्व मृतदेह बुलढाणा जिल्हा रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आले आहेत. शनिवारी संध्याकाळपर्यंत २५ मृतांपैकी २० जणांचे नातेवाईक जिल्हा रुग्णालयात पोहचले असून उर्वरित रात्री उशिरापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. मृतदेह जळाल्यामुळे शवगृहात त्यांना ३ दिवसापेक्षा अधिक वेळ ठेवता येणार नाही, असेही महाजन यांनी सांगितले. त्यामुळे आज या सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.