पिंपरी – सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना देखील त्यांच्या बजेटमध्ये सहलीचा आनंद घेता यावा, यासाठी राज्य परिवहन महामंडळाने सहलींचे आयोजन केले आहे. पिंपरी चिंचवड येथील वल्लभनगर आगारातून कोकण दर्शन ही दोन दिवस आणि महाबळेश्वर दर्शन ही एक दिवस सहलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोकण दर्शन ही दोन दिवस आणि एक रात्रीचा प्रवास असलेली सहल असेल. या सहलीसाठी वल्लभनगर आगारातून एसटी बस शनिवारी (दि. 16) रात्री नऊ वाजता निघेल. शनिवारी (दि. 16) रात्री नऊ वाजता तीन एसटी बस कोकण दर्शनसाठी निघणार आहेत. या सहलीत रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे, मार्लेश्वर, डेरवन ही स्थळे पाहता येणार आहेत.
ही निमआराम एसटी बस सोमवारी (दि. 18) रात्री दहा वजता आगारात पोहचेल. तीन दिवसीय या सहलीसाठी मोठ्यांना 1500 तर लहानांना 750 रुपये प्रवास खर्च असले. राहणे आणि नाष्टा-जेवणासाठी वेगळा खर्च करावा लागणार आहे. महामंडळातर्फेही तशी सुविधा पुरविण्यात येईल.
दर रविवारी महाबळेश्वर
महाबळेश्वर दर्शन सहलीसाठी प्रत्येक रविवारी आगारातून बस निघेल. ही बस वल्लभनगर आगारातून सकाळी सहा वाजता निघेल व त्याच दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत वल्लभनगर आगारात पोहचेल. या सहलीमध्ये वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रगापगड पाहता येणार आहे. सकाळी सहा वाजता निघालेली बस प्रतापगड येथे सर्वात प्रथम जाईल.
त्यानंतर प्रवाशांना ऑर्थर पॉईंट, मंकी पॉईंट, सनसेट पॉईंट पाहता येणार आहेत. जुने महाबळेश्वर येथील देवीचे दर्शन व पंचगंगा नदीचा उगाम पाहून परतीचा प्रवास सुरू होईल. त्याच दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत ही बस आगारात पोहचेल. यासाठी प्रवास खर्च हा मोठ्यांसाठी 660 व लहानांसाठी 310 रुपये आहे, असे आगारप्रमुख आर. टी. जाधव यांनी सांगितले.