लंडन – ब्रिटनमध्ये ऋषी सुनक हे पंतप्रधानपदाच्या अगदी समीप येऊन पोचले आहेत. माजी पंतप्रधान आणि हुजूर पक्षाचे दुसरे संभाव्य दावेदार बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ऋषी सुनक यांचा मार्ग सोपा झाला आहे. पंतप्रधान म्हणून पुन्हा सत्तेवर येण्याची ही योग्य वेळ नाही, असे कारण देऊन जॉन्सन यांनी माघार घेतली आहे.
ऋषी सुनक यांनी कालच पंतप्रधानपदासाठी आपली उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे. “देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी, पक्ष एकसंघ करण्यासाठी आणि देशासाठी काम करण्यासाठी’ आपण ही उमेदवारी जाहीर करत आहोत, असे सुनक यांनी म्हटले होते. पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर करण्यासाठी आज (सोमवारी) दुपारी 2 वाजेपर्यंतची मुदत होती. त्यापूर्वीच सुनक यांनी उमेदवारी जाहीर करण्यासाठी अनिवार्य असलेला किमान 100 खासदारांचा पाठिंबा सहज मिळवला होता.
बोरीस जॉन्सन यांनी माघार घेतल्यानंतर त्यांना पाठिंबा देणारे खासदारही आता सुनक यांना पाठिंबा देत आहेत. त्यामध्ये माजी गृहमंत्री प्रीति पटेल यांचाही समावेश आहे. सुनक यांना आतापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे त्यांची निवड आता जवळपास निश्चित मानली जाते आहे.
दुसरीकडे संभाव्य दावेदारांमध्ये कॉमन्स नेत्या पेनी मॉर्डन्ट या एकमेव नेत्या शिल्लक राहिल्या आहेत. मात्र त्यांना अद्याप 100 खासदारांचा पाठिंबाही मिळवता आलेला नाही. जर सुनक आणि मॉर्डन्ट यांच्यात लढत झालीच तर पक्षाच्या 1 लाख 70 हजार सदस्यांमध्ये ऑनलाईन मतदान घेतले जाईल. त्याचा निकाल शुक्रवारी जाहीर होईल. त्यातूनच ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण होणार हे समजेल.