लंडन – साधारणपणे राहणीमानासाठी जगातील कोणते देश चांगले आहेत याबाबत नेहमीच संशोधन केले जाते. आता नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालाप्रमाणे मरण्यासाठी कोणते देश चांगले आहेत याबाबत यादी प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये ब्रिटनने पहिला क्रमांक मिळवला आहे.
81 देशांच्या यादीमध्ये पराग्वे देशाने शेवटचा क्रमांक मिळवला आहे तर भारताचा नंबर 59 वा आहे. कॉलिटी ऑफ डेथ अँड डाइंग इंडेक्सचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. माणसाच्या आयुष्याच्या अंतिम क्षणांमध्ये त्याला कशा प्रकारचे जीवनमान प्राप्त होते त्याला आरोग्यविषयक सुविधा कशा प्राप्त होतात त्यांचा दर्जा काय असतो या विषयावरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
जगातील 81 देशांची यादी करण्यात आली असून त्यांची विभागणी ए, बी, सी, डी, ई, एफ या सहा गटांमध्ये करण्यात आली आहे. जगातील फक्त सहा देशांना ए ग्रेड मिळाली असून त्यामध्ये ब्रिटन टॉप वर आहे. त्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कोस्टारिका, आयर्लंड, दक्षिण कोरिया, तैवान या देशांनीही या यादीमध्ये स्थान मिळवले आहे.
एफ गटामध्ये 21 देश असून त्यामध्ये बांगलादेश, दक्षिणआफ्रिका, ब्राझील, सुदान, अर्जेंटिना, इथिओपिया या देशांचा समावेश आहे. भारताला या यादीमध्ये डी ग्रेड मिळाली आहे. डी ग्रेड मध्ये भारतासह चीन, रशिया हे मोठे देशही आहेत. अमेरिकेला सी ग्रेड देण्यात आली असून अमेरिकेचा क्रमांक 43 वा आहे. ज्या देशांचा एफ ग्रेड मध्ये समावेश करण्यात आला आहे त्या देशांना आपल्या देशातील आरोग्य सुविधांकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे या अहवालात सुचविण्यात आले आहे. ए गटात असणारे बहुतेक सर्व देश श्रीमंत देश आहेत आणि त्या देशांमधील आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या आहेत. या देशांत माणसाच्या अंतिम क्षणीही त्यांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होऊ शकतात.