बॅंकॉक – शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या आणि म्यानमार नेत्या आंग सान स्यु की यांच्याविरुद्ध 11वा भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लष्कराने एका वर्षापूर्वी आंग सान स्यु की यांना ताब्यात घेत सत्तेतून हटविले होते.
“द ग्लोबल न्यू लाईट ऑफ म्यानमार’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, स्यु की यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी दोषी आढळल्यास त्यांना जास्तीत जास्त 15 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठाविण्यात येउ शकते.
गेल्या वर्षी 1 फेब्रुवारी रोजी लष्कराने सत्ता ताब्यात घेतली. तेव्हापासून स्यु की यांना अनेक आरोपांचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे त्यांच्या समर्थक आणि मानवाधिकार गटांनी त्यांच्यावरील खटले निराधार आहेत. त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, करोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरल्यानंतर स्यु की यांना आधीच सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर गोपनीय कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली खटला चालवला जात आहे.