नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिन संचलन 2022 मधील सर्वोत्कृष्ट चित्ररथ आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी यासाठीचे निकाल घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वाधिक लोकप्रिय विभागातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. तर उत्तर प्रदेशचा चित्ररथ सर्वोत्कृष्ट चित्ररथ ठरला आहे.
तीन सुरक्षा सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ)/इतर सहाय्यक दल आणि विविध विभागातील दल, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय मंत्रालये/विभाग यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी न्यायाधीशांच्या तीन समित्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या समितीने शुक्रवारी सर्वोत्कृष्ट चित्ररथ आणि सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी यासाठीचे निकाल घोषित केले आहेत.
समितींच्या मूल्यांकनाच्या आधारे, भारतीय नौदलाच्या संचलन तुकडीला तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून घोषित करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) सीएपीएफ/इतर सहाय्यक दलांमध्ये सर्वोत्कृष्ट संचलन दल म्हणून निवडण्यात आले आहे.
26 जानेवारी 2022 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामधे सहभागी झालेल्या 12 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची सर्वोत्कृष्ट म्हणून निवडल झाली. उत्तर प्रदेशचा चित्ररथ “एक जिल्हा एक उत्पादन आणि काशी विश्वनाथ धाम’ या संकल्पवेवर आधारित होता. दुसरे स्थान कर्नाटकच्या “पारंपारिक हस्तकले’वर आधारित चित्ररथाला मिळाले. तिसरे स्थान “मेघालयच्या राज्याची 50 वर्षे आणि महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्था आणि बचगट यांना मानवंदना’ या विषयावरील चित्ररथासाठी मेघालयला मिळाले.
पहिल्यांदाच, मायजीओव्ही व्यासपीठाद्वारे लोकप्रिय निवड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट संचलन दल आणि सर्वोत्कृष्ट चित्ररथासाठी मतदान घेतले होते. मतदानासाठी सर्वसामान्यांना आमंत्रित करण्यात आले होते. 25-31 जानेवारी 2022 दरम्यान ऑनलाइन मतदान घेण्यात आले. लोकप्रिय निवडीनुसार, भारतीय हवाई दलाची संचलन तुकडी तिन्ही सेवांमध्ये सर्वोत्तम संचलन तुकडी म्हणून निवडली गेली आहे.
लोकप्रिय निवड श्रेणीमध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची सर्वोत्तम म्हणून निवड झाली. महाराष्ट्राचा चित्ररथ “महाराष्ट्रातील जैवविविधता आणि राज्य जैव-मानके’ या संकल्पनेवर आधारित होता. उत्तर प्रदेशाला (लोकप्रिय पसंती) द्वितीय क्रमांक मिळाला, तर “जम्मू आणि काश्मीरचा बदलणारा चेहरा मोहरा’ या विषयावरील जम्मू आणि काश्मीरच्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला.