सातारा – उरमोडी धरणपात्रात रविवारी पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. रात्री अंधार असल्याने सोमवारी सकाळी स्थानिक नागरिक व रेस्क्यू टीमने शोध कार्य घेण्यास सुरुवात केली. बारा वाजण्याच्या सुमारास एक तर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान दुसरा मृतदेह सापडला. दोन्ही युवक सातारा येथील सदरबझार परिसरात राहणारे आहेत. स्थानिक नागरिक, कुटुंबीय, रेस्क्यू टीम व कातकरी समाजातील लोकांनी सुमारे 18 तास शोध मोहीम राबवली.
याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौरव सुनील चौधरी (वय22) व आकाश रामचंद्र साठे (वय 20, रा. सदरबाजार सातारा) हे दोन्ही युवक रविवारी दुचाकीवरून उरमोडी धरणावर पोहण्यासाठी गेले होते. सायळी गावाच्या हद्दीत असलेल्या झुडपातील रस्त्यातून त्यांनी धरणपात्रात प्रवेश केला. याठिकाणी धरण पात्रात पोहत असताना अन्य कोणीही त्याठिकाणी नव्हते. काही अंतरावर एक कुटुंबीय गप्पा मारत बसले होते. त्या युवकांनी ठेवलेले कपडे तसेच मोबाइल हे त्या कुटुंबातील सदस्यांच्या निदर्शनास आले. यावेळी सौरवचा मोबाइल सतत वाजत होता. सतत फोन वाजत असल्याने त्यांनी तो फोन उचलून सौरवच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी सौरवची आई विचारत होती की सौरव कुठे आहे? कोण बोलत आहात?
त्या कुटुंबीयांनी उत्तर दिले की “हा मोबाइल उरमोडी धरण परिसरात असून येथे दोन युवक पोहण्यासाठी गेले आहेत. मात्र, बराच वेळ झालं ते इकडे परत आलेच नाहीत आणि पाण्यातही दिसत नाहीत.’ हे ऐकून सौरवची आई पुरती घाबरली व तिने आरडाओरडा करतच घरातील इतर सदस्यांना माहिती दिली. त्यानंतर तात्काळ सौरवचा मोठा भाऊ गौरव व काही मित्र घटनास्थळी आले. त्यांनी परिसरात पाहणी केली. मात्र, काहीही आढळून आले नाही. तोपर्यंत अंधार झाला होता. शिवेंद्रसिंह रेस्क्यू टीमला याबाबत बाबत माहिती दिली. मात्र, तोपर्यंत अंधार झाला होता.
सोमवारी सकाळी लवकर स्थानिक ग्रामस्थ, कातकरी समाजातील काही व्यक्ती व कुटुंबीयांनी शोध मोहीम सुरु केली. नऊ वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीमचे काही सदस्य दाखल झाले. मात्र, त्यांनाही मृतदेह सापडला नाही. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनीही स्वतः बोटीत चढून शोध घेतला. त्यांनाही यश आले नाही. अंबवडे येथील काही युवकांनी शर्थीचे प्रयत्न करून बारा वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. तो मृतदेह आकाश रामचंद्र साठे याचा होता. दुसऱ्या मृतदेहाचा शोध पाऊसही पडत असतानाही सुरु होता. सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांच्या सुमारास दुसरा मृतदेहही शोधून काढण्यात यश आले. तो मृतदेह सौरव सुनील चौधरी याचा असल्याचे निष्पन्न झाले. उरमोडी धरणातून दोन्ही मृतदेह बाहेर काढल्यानंतर नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा मन पिळवाटून टाकणारा होता.