भोर, मांढरदेवी, पाचगणी, महाबळेश्वर रस्ता होणार सुसाट
कॉंक्रिटीकरण कामाला सुमारे 340 कोटींचा निधी मंजूर
कापूरहोळ-भोर ते वाई रस्त्याचे कामासही झाला प्रारंभ
भोर – भोर तालुक्यातील कापूरहोळ-भोर-मांढरदेवी ते वाई सुरूर फाटा या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाला सुमारे 340 कोटींचा निधी मंजूर असून रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे भोरवरून मांढरदेवीकडे जाणाऱ्या भाविकांची होणारी गैरसोय कायमची संपणार असून वाई, पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनात वाढ होणार असून रोजगाराच्या संधीबरोबरच भोरच्या बाजारपेठेतील व्यापारी उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला आहे.
कापूरहोळ-मांढरदेवी ते वाई या 54.88 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी अंदाजित 340 कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तो आमदार संग्राम थोपटे यांनी शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता. त्यास मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एम. एस. औताडे कंपनीकडून हे रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली असून आडथळा ठरणारी झाडे काढूनन मोऱ्यांची कामे सुरू झाली आहेत.
या रस्त्यामुळे माहाबळेश्वरला जाण्याचे अंतरही कमी होणार आहे. पर्यटनात वाढ होऊन रोजागाराला चालना मिळणार आहे. दरम्यान भोर कापूरहोळ रस्ता अत्यंत अरुंद असून रस्त्यावर वेडीवाकडी वळणे आहेत साईटपट्या खचल्या असून झाडेझुडपे वाढली आहेत. अनेक ठिकाणी रस्ता तीव्र उताराचा आहे, यामुळे सतत अपघात घडतात याशिवाय भोर तालुक्यात आंबाडखिंड घाट आणि वाई तालुक्यातील अवघड घाट रस्ता असून रस्ता मोठ्या प्रमाणात चढ-उताराचा आहे. पावसाळ्यात दरडी कोसळतात त्यामुळे अनेकदा घाट मार्ग बंद राहतो. धोकादायक प्रवास असल्यामुळे पर्यटक भोरमार्गे न जाता पुणे-सातारा मार्गाने सुरुर फाट्यावरून महाबळेश्वरला जाणे पसंत करतात.
या रस्त्यावरील वळणे रुंद करणे, चढ-उतार कमी करणे, जुने पूल मोऱ्या रुंद करणे, नवीन पूल मोऱ्या बांधणे, संरक्षक भित बांधणे, रेलिंग करणे, रिफ्लेक्टर लावणे, सूचना फलक लावले जाणार आहेत. घाटात अरुंद रस्ता रुंद करणे संरक्षक भिंत घालणे ही कामे होणार आहेत. कापूरव्होळ ते भोरपर्यंत 10 मीटर रुंदीचा तीन लेनचा कॉंक्रिट रस्ता होणार आहे. भोर शहरातील रस्ता 12 मीटर आणि भोर ते वाई दरम्यान 7 मीटर रुंदीचा होणार आहे. बाजूला दीड मीटर साईटपट्ट्या आणि आरसीसी, गटारे व रस्ता होणार असून मांढरदेवी मंदिराकडील रस्ताही होणार आहे.
या 54.88 किलोमीटर रस्त्यावर 15 गावे असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला 12 बस थांबे उभारून त्याचे विद्युतीकरण करण्यात येणार आहे. रस्त्यावरील 102 जून्या आणि 36 ठिकाणी नवीन मोऱ्यांचे बांधकाम होणार आहे. नेरे गावापुढे एक नवीन पूल तर नीरा नदीवरील तीन जुन्या पुलाचे रुंदीकरण केले जाणार आहे. रस्त्याच्या कामासाठी रस्त्यावरील 934 झाडे तोडली जाणार असून, रस्त्याचे काम झाल्यावर सध्याच्या झाडांच्या तीनपट 2800 झाडाची लागवडी करण्यात येणार आहे.
नेकलेस पॉईंट पर्यटकांचे आकर्षण
या रस्त्यावरील खंडोबाचा माळ येथील नीरा नदीपात्रात तयार झालेल्या नेकलेस पॉईंट पर्यटकांचे आकर्षण आहे. येथे व मांढरदेवी मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक टाकून बसण्यासाठी बाकडी ठेवली जाणार असून, सुशोभीकरण करून पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामुळे येथील सेल्फी पॉईंटच्या पर्यटकात वाढ होणार आहे, अशी माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वागज, शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी दिली.
भोर-कापूरहोळ-मांढरदेवी-वाई रस्त्याचे काम मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करून काम मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. यामुळे भोर, पाचगणी, महाबळेश्वर जोडले जाणार असल्याने भोरच्या पर्यटनात पर्यायाने रोजगाराला चालना मिळणार आहे.
– संग्राम थोपटे, आमदार, भोर-वेल्हे-मुळशी