पुन्हा भडका! मुंबई-पुण्यात पेट्रोलची शंभरी पार; वाचा आजचा भाव

मुंबई : देशामध्ये एकीकडे करोनाचे संकट आहे तर दुसरीकडे महागाईचा फटका नागरिकांना बसताना दिसत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा इंधनाचे दर वाढल्याने मुंबईत पेट्रोलची किंमत १०२ रुपये प्रति लिटरपेक्षाही जास्त  झाली.

आज  इंडियन ऑइल कॉर्परेशनने पेट्रोलचे दर प्रति लिटरमागे २५ पैशांनी तर डिझेलचे दर १३ पैशांनी वाढवले आहेत. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलेचे दर ९६.४१ रुपये प्रति लिटरवरुन ९६.६६ वर पोहचले आहेत. तर दिल्लीतील डिझेलचे दर ८७.२८ रुपये प्रति लिटरवरुन ८७.४१ प्रति लिटरवर पोहचलेत. मुंबईमध्ये आज एक लिटर पेट्रोलसाठी १०२.८२ रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ९४.८४ रुपये मोजावे लागत आहेत.

इंडियन ऑइल कॉर्परेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारच्या मालकीच्या तेल कंपन्या रोज इंधनाचे दर बदलत असतात. जागतिक स्तरावर तेलाचे दर वाढल्याने इंधन दरवाढ होत असल्याचे सांगण्यात येत आहे. रोज सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू केले जातात. वेगवेगळ्या राज्यांकडून आकारण्यात येणारे कर हे वेगवेगळे असल्याने देशभरामध्ये राज्यनिहाय दर बदलतात.

महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचे दर १०५.१५ रुपये आणि डिझेलचे दर ९५.६३ रुपयांपर्यंत पोहचलेत. नागपूरमध्ये पेट्रोल मुंबईप्रमाणेच १०२ रुपयांहून अधिक किंमतीला मिळत आहे. नांदेडमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी जवळजवळ १०५ रुपये मोजावे लागत आहेत. बीड, जालना, सिंधुदुर्ग, यवतमाळमध्येही पेट्रोलचे दर १०४ रुपये प्रति लिटरपेक्षा अधिक आहेत.

राजस्थानमधील श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलच्या दराने नवा उच्चांक गाठलाय. येथे एका लिटर पेट्रोलसाठी १०७.७९ रुपये मोजावे लागत आहेत. तर येथे डिझेल १००.५१ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. मध्य प्रदेशमधील अनुपनगरमध्ये पेट्रोल १०७.४३ रुपयांना तर डिझेल ९८.४३ रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. रीवामध्ये पेट्रोल १०७.०६ रुपये आणि डिझेल ९८.१० रुपये प्रति लिटर दराने मिळतंय. भोपाळमध्येही पेट्रोलचे दर १०४.८५ रुपये लीटर आणि डिझेल ९६.०५ रुपये लीटर दरात मिळतंय.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.