भिगवण -येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमधील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन भाजपच्या वतीने इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई रेडके यांनी केले. (दि.8) सायंकाळी बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. त्यापूर्वीच भाजपने राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक करीत उद्घाटन केले.
माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून ट्रॉमा केअर सेंटरची इमारत मंजूर झाल्याचा व पंचायत समितीने भिगवण येथे कोविड केअर सेंटरच्या मागणीस यश आल्याचा दावा करीत कोविड सेंटरचे उद्घाटन पंचायत समितीच्या माध्यमातून केले. त्यामुळे उद्घाटनावरून भाजप- राष्ट्रवादीमध्ये कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.
यावेळी उपसभापती संजय देहाडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक वणवे, कर्मयोगीचे संचालक यशवंत वाघ, इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे, माजी सरपंच पराग जाधव, तक्रारवाडीच्या सरपंच शोभाताई वाघ, डिकसळचे सरपंच सूर्यकांत सवाणे, मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते, ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर, रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर, सुनील काळे, सतीश काळे, राजेंद्र जमदाडे, विकास वाघ, दिनेश मारणे, माऊली मारकड, गणेश वायदंडे, हनुमंत काजळे, विश्वास देवकाते, युवराज काळंगे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुरेखा पोळ, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट उपस्थित होते.
रेडके म्हणाल्या, भिगवण परिसरामध्ये करोना रुग्णाची वाढती संख्या विचारात घेऊन भिगवण येथे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी पंचायत समितीच्या माध्यमातून केली होती. इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे म्हणाले, भिगवण परिसरातील नागरिकांची सोय व्हावी, यासाठी तत्कालीन सहकारमंत्री पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर मंजूर केले. यावेळी संजय देहाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
महामारीत राजकारण नको- राष्ट्रवादी कॉंग्रेस
संध्याकाळी उद्घाटन होणार असल्याचे राष्ट्रवादीकडून जाहीर केले. मात्र करोना साथीच्या काळात राजकारण नको, अशी राष्ट्रवादीकडून भूमिका मांडण्यात आली. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अधिकृत उद्घाटन सोहळा संध्याकाळी होणार असल्याचे स्पष्ट केले.
अचानक उद्घाटन करणे योग्य नाही- तावडे
भिगवण सरपंच अनिता तावडे यांनी म्हणाले की, कोविड सेंटर उभारणीसाठी प्रामुख्याने भिगवण ग्रामपंचायतीने प्रयत्न केलेले आहेत. नियोजन केलेले आहे, असे असताना अचानकपणे येऊन सेंटरचे उद्घाटन करणे योग्य नाही.
भाजपने श्रेय घेऊ नये- बोगावत
भिगवण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सचिन बोगावत म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने सेंटर उभारणीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे. विविध संस्था व संघटनांची मदत घेण्यात आली आहे. सेंटरसाठी साहित्य जमा करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडली आहे, याचे श्रेय भाजपने घेणे योग्य नाही