पुण्याच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहोळ तर आघाडीचे प्रकाश कदम

पुणे – महापालिकेत विक्रमी बहुमत असलेल्या भाजपचा दुसरा महापौर आज अखेर निश्‍चित झाला आहे. महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केले आहे. महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर उपमहापौर पदासाठी सरस्वती शेडगे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, महापौरपद एका वर्षांसाठी असणार आहे.

तसेच पुणे महानगरपालिका महापौर पदासाठी आघाडीचे प्रकाश कदम यांनी अर्ज भरला आहे. यावेळी विरोधी नेते दिलीप बराटे, काँग्रेस गट नेते अरविंद शिंदे, नगरसेवक युवराज बेलदरे, गफूर पठाण,योगेश ससाणे, सायली वांजळे, सचिन दोडके, भैय्यासाहेब जाधव, गणेश ढोरे, प्रिया गदादे आदी उपस्थित होते.

162 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत भाजपचे तब्बल 99 नगरसेवक आहेत. महापालिका निवडणुकीनंतर भाजपने मुक्ता टिळक यांना महापौरपद दिले होते. त्यासाठी त्यांना अडीच वर्षांची मुदत देण्यात आली होती. मात्र, ही मुदत विधानसभा निवडणुकीपूर्वी संपत असल्याने शासनाने या पदास तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ही मुदत 22 नोव्हेंबर 2019 ला संपत आहे. दरम्यान, या पदासाठी मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या लॉटरीत हे पद सर्वसाधारण खुल्या गटासाठी आरक्षित झाल्याने भाजपचा कोणीही नगरसेवक महापौर होऊ शकणार आहे. त्यामुळे या पदासाठी पक्षात मोठी रस्सीखेच झाली आहे. तर भाजपचे अनुभवी सदस्य असलेले मुरलीधर मोहोळ, हेमंत रासने, धीरज घाटे, वर्षा तापकीर, मंजुषा नागपुरे, राजेंद्र शिळीमकर यांची नावे आघाडीवर होती. अखेर महापौरपदाची माळ मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात पडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.