संगणक टायपिंग परीक्षा जानेवारीत होणार

नियमित शुल्कासह 6 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने नियमित विद्यार्थ्यांसाठी येत्या जानेवारी शासकीय संगणक टायपिंग परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 6 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

शासकीय संगणक टायपिंग संस्थेमार्फत जुलै ते डिसेंबर या सत्रासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन त्यांची ऑनलाइन नोंदणी परिषदेच्या संकेतस्थळावर करण्यात आलेली आहे. याच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार आहे. मागील परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही रिपीटर म्हणून परीक्षेला बसता येणार आहे.

परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी 7 नोव्हेंबरपासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 7 ते 13 डिसेंबर दरम्यान विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. 14 ते 20 डिसेंबर या कालावधीत अतिविलंब शुल्कासह अर्ज दाखल करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरून चलन अपडेट झाल्याशिवाय अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. ऑनलाइन शिवाय इतर कोणत्याही पद्धतीने परीक्षा शुल्क भरल्यास ते ग्राह्य धरण्यात येणार नाही. अर्जाची मुदत संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, विषय बदल, फोटो बदल या दुरुस्त्या करण्यासाठी दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थांनी विद्यार्थ्यांचे अर्ज अचूक भरणे बंधनकारक आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्‍यक
या परीक्षेला बसण्यासाठी शासनमान्य शाळेतून विद्यार्थ्यांनी किमान इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करणे आवश्‍यक आहे. आठवड्यातून किमान 4 तासांप्रमाणे परीक्षेच्या तारखेपूर्वी 4 महिने किंवा 80 घड्याळी तास नियमित विद्यार्थी म्हणून प्रशिक्षण करणे आवश्‍यक आहे. 30 व 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी, मराठी, हिंदी माध्यमासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षेला बसता येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)