मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसापासून राजकीय वर्तुळात रंगल्या आहे, अशात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बीआरएसने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती अशीही चर्चा रंगली होती. पंरतु त्यावेळी मुंडे यांच्याकडून या चर्चांवर कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती.
अशात आता पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मीडियाशी संवाद साधताना बीआरएसच्या ऑफरवर थेट प्रतिक्रिया व्यक्त केली. बीआरएसची ऑफर मी माध्यमातून पाहिली. माझे विचार गुप्त आणि अंडरग्राउंड असतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी बीआरएसची ऑफर थेट नाकारली नाही. त्याऐवजी त्यांनी सूचक विधान केलं. त्यामुळे पंकजा यांच्या मनात काय चाललंय? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्यामुळे आगामी काळातील पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक कृतीला राजकीय अर्थ असणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, यापूर्वीही मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती की,’माझ्या विषयी जर सर्व पक्ष साकारात्मक बोलत असेल तर मी त्यांच्या विषयी नकारात्मक बोलणार नाही. मला आलेल्या ऑफर बाबत मी सिरियसली विचार केला नाही. मात्र या ऑफरकडे मी बघणार नाही असे मुळीच नाही. कारण कोणत्याही व्यक्तीला सिरीयसली न घेणे हा त्यांचा अपमान असतो, असे मुंडे यांनी सांगितले होते.