मुंबई – दीपाली सय्यद येत्या काही काळात शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यापासून दीपाली सय्यद यांची भूमिका नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या बाजुची राहिली आहे. अखेर त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करत ठाकरे गटाला रामराम ठोकला आणि शिंदे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश लांबला आहे.
दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अनेक आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. तसेच, देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाला भाजपने नकार दिला आहे. दीपाली सय्यद माफी मागत नाहीत, तोवर त्यांना शिंदे गटात प्रवेश करता येणार नाही, अशी भूमिका भाजपच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी घेतली आहे.
दरम्यान, 12 नोव्हेंबर रोजी दीपाली सय्यद यांचा पक्षप्रवेश होणार होता. मात्र, शिंदे गटाकडून अद्याप कोणताही निर्णय न झाल्यामुळे दीपाली सय्यद या प्रतिक्षेत आहेत.