निगडी पोलिसांची पहाटे पुण्यात कारवाई
पिंपरी – भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावाने एका रुग्णालयात फोन करून २५ लाखांची मागणी केली. या प्रकरणी निगडी पोलिसांनी गुरुवारी (दि. २३) पहाटे कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
निगडीतील एका नामांकित रुग्णालयात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने फोन आला. “करोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपला गोरगरिबांना मदत करायची आहे. त्यासाठी तुम्ही २५ लाख रुपये द्या. पैसे देण्यासाठी मी पर्वती मधील एका कार्यकर्त्याला पाठवतो.” असा फोन आला. पैसे न दिल्यास बघून घेण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी शुक्रवारी (दि. १७) निगडी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सखोल तपासाला सुरुवात केली. सर्वप्रथम पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे येरवडा येथील एका नारळ विक्रेत्याला ताब्यात घेतले. मात्र, त्याने आपला फोन २९ जून रोजी चोरीस गेल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये त्याचा फोन खरोखर चोरीस गेल्याचे दिसून आले.
त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा ‘त्या’ मोबाइल चोराकडे वळविला. तांत्रिक माहितीच्या आधारे त्या मोबाइल चोराच्या वाहनाचा क्रमांक आणि त्यातून त्याच्या घरचा पत्ता मिळवला. तो राहात असलेल्या ठिकाणाची पोलिसांनी पाहणी केली. संध्याकाळी किंवा रात्री त्यांच्या घरावर छापा घातला आणि तो घरात नसला तर तो सावध होऊन पळून जाईल अशी शक्यता होती. त्यामुळे पहाटेच्या सुमारास कारवाई करण्याचा निर्णय निगडी पोलिसांनी घेतला. गुरुवारी पहाटे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. आता त्याची कसून चौकशी निगडी पोलिसांकडून सुरू आहे.