पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अजब कारभारामुळे आणि ठेकेदाराच्या मनमानीमुळे तब्बल ८ ते १० जणांना आपला बुधवारी दिवसभरात जीव गमावावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे ऑक्सीजन बंद असतानाही ऑक्सीजन सुरू असल्याचा दावा करणाऱ्या ठेकेदाराने ऑक्सीजनचा पुरवठा अपुरा असल्याची कबुली दिल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका चुकीच्या कारभारामुळे आणखी किती जणांचा बळी घेणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण हे रुग्णालय कोविडसाठी निश्चित करण्यात आले आहे. या रुग्णालयामध्ये सध्या कोविड पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात सध्या ३० व्हेंटीलेटर असून ऑक्सीजनच्या पुरवठ्यासाठी नव्याने लाईन टाकण्यात आल्या आहेत. या शिवाय रुबी अलकेअर या खासगी संस्थेला दिलेले ३४ व्हेंटीलेटर बेड ताब्यात घेण्यात आले आहेत.
या सर्व बेडसह ऑक्सीजन मास्कचा पुरवठा करण्यासाठी एका ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वीही अनेकवेळा या ठेकेदाराकडून व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांना चुकीच्या पद्धतीने ऑक्सीजनचा पुरवठा झाल्यामुळे आपला जीव गमावावा लागला होता. आता कोविडसाठी वायसीएम रुग्णालय राखीव केल्यानंतरही अत्यंत बेजबाबदारपणा समोर आला आहे.
बुधवारी दुपारपासून ऑक्सीजन पुरवठ्यामध्ये बिघाड झाल्यामुळे दिवसभरात तब्बल ८ ते १० जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे समोर आले आहे. ऑक्सीजन मास्कचा पुरवठा कमी होणे, अचानकपणे ऑक्सीजन बंद होणे असे प्रकार घडल्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत असलेल्या काहीजणांचा ऑक्सीजन अचानकपणे बंद अथवा पुरवठा अनियमित झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला.
अत्यंत मायक्रो प्लॅनिंगच्या गप्पा मारणाऱ्या आयुक्तांसह वैद्यकीय अधिकारी व वायसीएमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे या रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. केवळ ठेकेदार पोसण्यामध्ये गुंग असलेले अधिकारी आणखी किती जणांचा जीव घेणार हा प्रश्न अनुत्तरीत असून वायसीएम रुग्णालयातील कारभार कधी सुधारणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन तीन दिवसांपासून तक्रारी
वायसीएम रुग्णालयात दाखल असलेल्या अनेक रुग्णांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या गेल्या दोन- तीन दिवसांपासून तक्रारी येत आहेत. वायसीएममध्ये मयत होण्याचे प्रमाणही वाढले आहे. मात्र ऑक्सीजनच्या अनियमिततेमुळे हा प्रकार घडला का? याबाबत मला निश्चित माहिती नाही. रात्री १० च्या दरम्यान ऑक्सीजनबाबत मला माहिती मिळाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत मी चर्चा करत आहे. ऑक्सीजनचा ठेकेदार यामध्ये दोषी आढळल्यास त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मी स्वत: आयुक्तांकडे करणार आहे.
सुलक्षणा शिलवंत- धर, नगरसेविका, संत तुकाराम नगर प्रभाग