इंदौर – नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती देशभरात साजरी करण्यात आली. बोस यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पक्षानं देशाच्या विविध भागांत ‘पराक्रम दिवस’ साजरा केला. संपूर्ण देशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी होत असताना भाजपचे इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांनी ‘नेताजी चंद्रशेखर बोस’ जयंती साजरी केली.
बोस यांच्या जयंती निमित्त इंदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खासदार लालवानी नेताजींसारखी टोपी घालून आले होते. मात्र भाषण देत असताना त्यांनी नेताजींना ‘चंद्रशेखर आझाद’ म्हटलं. आपलं काही चुकत असल्याचं समजल्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरलं. मात्र पहिल्या चुकीनंतर त्यांनी लगेच दुसरी चूक केली. लालवानी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना चक्क ‘चंद्रशेखर बोस’ संबोधले. कहर म्हणजे त्यांनी एकदाही त्यांच्या भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस म्हटलं नाही.
यावेळी लालवानी यांनी नेताजींच्या कर्तृत्त्वाचं वर्णन केलं. ‘नेताजींनी नोकरी सोडून देशाची सेवा केली. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी योगदान दिलं. आझाद हिंद सेनेची स्थापना करून त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. अशा नेताजी चंद्रशेखर आझाद… चंद्रशेखर बोस यांची जयंती आपण साजरी करत आहोत,’ असं लालवानी भाषणात म्हणाले.