लखनौ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवल्याबद्दल उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार राकेश राठोड अडचणीत आले आहेत. राठोड यांच्या कृतीची गंभीर दखल घेऊन भाजपने त्यांना बेशिस्तीबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षविरोधी कारवायांबद्दल त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
करोनाविरोधी लढ्यासाठी जनतेत ऐक्यभावना निर्माण होण्याच्या उद्देशातून मोदींनी काही दिवसांपूर्वी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाविषयी प्रतिकूल टिप्पणी करणारी राठोड यांची एक ऑडियो क्लिप गुरूवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. भाजपच्या एका स्थानिक नेत्याशी राठोड बोलत असल्याची ती क्लिप होती.
टाळ्या आणि शंख वाजवून करोना जाईल का? त्या कृतीतून मूर्खपणाचा रेकॉर्ड मोडला जात आहे, असे राठोड म्हणताना आढळतात. आपल्याच एका आमदाराच्या प्रतिकूल टिप्पणीमुळे भाजपची गोची झाली. त्यातून राठोड यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याच्या उद्देशातून उत्तरप्रदेश भाजपने पाऊले उचलली आहेत. राठोड यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटिसीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.