मुंबई – राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर कोणतीही नोटीस किंवा पूर्वसूचना न देता ईडीने कारवाई सुरु केली आहे. या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तसेच विरोधी पक्षाकडून राजकीय प्रतिक्रिया येत आहे. यातच भाजप नेते मोहित कंबोज यांनी मलिक यांच्यावर एक धक्कादायक आरोप केलाय.
मुंबईत पत्रकार परिषद घेत मोहित कंबोज यांनी मलिक यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. ‘नवाब मलिकांनी अनेक मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसायामध्ये ढकलले अशी कबुली अनेक मुलींनी दिली आहे. ते पुढे म्हणाले,’आम्ही स्टिंग ऑप्रेशन्स केली असून त्यामध्ये मुलींनी मलिकांवर गंभीर आरोप केले आहे. मलिक यांचा वेश्या व्यवसाय, ड्रग्ज पेडलिंग अन् देशाविरोधी कारवायांशी संबंध असल्याचा दावाही कंबोज यांनी केलाय.
दरम्यान, याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं की, यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचं हे उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण, नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही,” असही शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे