नवी दिल्ली – चंदीगड महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आम्हाला पडलेली आठ मते कशी बाद केली याचा सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा आम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे. त्यात भाजप मतांची हेराफेरी करताना रंगेहाथ सापडली आहे.
त्यांच्या पापाचा घडा आता भरला आहे. अशा वेळी देवच पृथ्वीवर अवतार घेऊन पापी लोकांचा नाश करतो हा इतिहास आहे अशा शब्दात आम आदमी पक्षाने आज भाजपवर निशाणा साधला आहे. आम आदमी पक्षाने एक्सवर ही प्रतिक्रीया दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयानेही काल या प्रकरणाची दखल घेत पीठासीन अधिकाऱ्यावर कडक ताशेरे मारले आहेत. आम्ही लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
या पक्षाने म्हटले आहे की पीठासीन अधिकाऱ्याने स्वत:च्या हाताने आमची मते बाद केली ही त्यांची कृती सीसीटीव्हीत कैद आहे आता या पेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो? असा सवालही आपने केला आहे.
हा भाजपच्या हुकूमशाहीचा जिवंत पुरावा आहे. देशात या पद्धतीने निवडणुका होतात का? ही लोकशाहीची थट्टा आहे. ही लोकशाहीची हत्या आहे. रिर्टर्निंग अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी टिप्पणीही भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड केली आहे.
त्याचा दाखलाही आम आदमीपक्षाने दिला आहे. चंदीगडची निवडणूक छोटी होती पण भाजप सारखा जगातला मोठा पक्ष तिथही मतांची हेराफेरी करताना पकडला गेला आहे अशी टीका केजरीवालांनीही आधी केली आहे.