श्रीगोंदा – कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिद्धटेक (ता.कर्जत) येथील जाहीर सभेत समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
गेल्या दोन महिन्यांपासून नागवडेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा झडत होत्या. अखेर नागवडे यांच्या भाजप प्रवेशाने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. गुरुवारी (दि.10) सायंकाळी कॉंग्रेसनेते राजेंद्र नागवडे, माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, दीपक नागवडे यांसह नगरसेवक व नागवडे कारखान्याच्या संचालकांच्या शिष्टमंडळाने प्रवरा लोणी येथे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी झालेल्या चर्चेत शुक्रवारी सिद्धटेक (ता. कर्जत) येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत नागवडे व समर्थकांच्या भाजप प्रवेश करण्याचा निर्णय झाला. शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत राजेंद्र नागवडे यांनी समर्थकांसह भाजप प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुष्पगुच्छ आणि भाजपचा पंचा देऊन नागवडे यांचे भाजपमध्ये स्वागत केले.
यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार सुजय विखे, आमदार सुरेश धस, माजीमंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते. नागवडे यांच्यासह बाजार समितीचे सभापती धनसिंग भोयटे, तालुका दूध संघाचे अध्यक्ष सोपानराव थिटे, कॉंग्रेसचे मावळते तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर आदींसह नागवडे समर्थकांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
नागवडे यांच्याबरोबर नगराध्यक्षा शुभांगी पोटे यांच्यासह कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार होते. मात्र ऐनवेळी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा पक्षप्रवेश लांबणीवर टाकण्यात आला. परंतु याचे कारण मात्र समजू शकले नाही.
अनुराधा नागवडेंचा भाजप प्रवेश नाही!
कॉंग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांनी भाजप प्रवेश केला असला तरी त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी मात्र भाजप प्रवेश केला नाही. अनुराधा नागवडे या कॉंग्रेसकडून जिल्हा परिषद सदस्य असल्याने जिल्हा परिषदेतील सदस्यत्व वाचवण्यासाठी त्यांनी अधिकृत प्रवेश केला नसल्याचे समजते.