सुकलवाडीत विद्यार्थ्यांचा पाण्यातून शाळेसाठी प्रवास

भुयारी मार्गात साठले पाणी : रेल्वे प्रशासनाचा मनमानी कारभार

वाल्हे – येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी तळाकडे जाण्यासाठीचा प्रमुख मार्ग, तसेच सुकलवाडीसह लहान-मोठ्या गावांना जोडणाऱ्या सुकलवाडी रेल्वे गेट येथील भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचल्यामुळे प्रवाशांसह, विद्यार्थ्यांना धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाल्हे परिसरात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने सुकलवाडी फाट्याजवळील रेल्वे गेटचा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला आहे. गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाने येथील रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचे काम हाती घेतले होते. श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या अगोदर काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काम कासव गतीने सुरू आहे.

वाल्हेसह सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीची वाडी, गायकवाडवाडी तसेच गुळुंचे, कर्नलवाडी, राख आदी भागांना जोडणाऱ्या या रेल्वेच्या भुयारी मार्गावरून असंख्य प्रवासी व शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थी ये-जा करतात. केवळ रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे या मार्गाचे काम पूर्णतः रखडले असून, ठिकठिकाणी तडे गेल्याने भुयारी मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे.

सध्या साठलेल्या पाण्यातून येथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून पाण्यातून वाट काढावी लागत आहे. साठलेल्या पाण्यातून जाताना आतापर्यंत अनेक दुचाकीस्वार पडले आहेत. चारचाकी वाहनांमध्ये पाणी गेल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित समस्या सोडविण्याची मागणी वाल्हे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, “तंटामुक्ती’चे माजी अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, सुकलवाडीच्या सरपंच जयश्री चव्हाण, उपसरपंच धनंजय पवार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नारायण पवार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.