भाजप कार्यकर्त्यांवर थेट “मुख्यमंत्र्यांचा वॉच’

मोबाईल ऍपवर करावी लागते प्रचाराची अद्ययावत माहिती मुख्यमंत्री वॉररूमवरून हालतात सूत्र

नगर – नगरसह शिर्डी लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. उमेदवारांकडून गावागावात जावून प्रचार केला जात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, प्रचारसभा, कोपरा सभांवर भर द्यायला सुरुवात केलेली आहे. दुसरीकडे सोशल मिडीयाचा जोरदार वापर प्रचारासाठी सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारावर नजर ठेवली असून मुंबईतल्या त्यांच्या वॉररुममधून कार्यकर्त्यांवर थेट “वॉच’ ठेवला जात आहे. पक्षाने नेमलेल्या बूथप्रमुख, शक्‍तीप्रमुख आणि मंडल प्रमुखांसाठी मोबाईल ऍप उपलब्ध करुन देण्यात आले आहे.दररोज केलेल्या पक्षाच्या कामाची माहिती कार्यकर्त्यांना या अँपवर अपलोड करावी लागत आहे. अपलोड केलेल्या या माहितीची खातरजमा करण्यासाठी फडणवीसांच्या मुंबई कार्यालयातून कार्यकर्त्यांना थेट दुरध्वनी करुन विचारणा होत आहे.

नगर जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात मुख्यमंत्र्यांची वॉररुम उभारण्यात आली असून तेथे खास कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथून निवडणूक प्रचारासह नेते व कार्यकर्त्यांचा कामचा आढावा घेण्यात येत आहे. भाजपने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया आणि इंटरनेट माध्यमाचा जोरदार वापर केला होता. भाजपची टेक्‍निकल टीमही सक्षम असल्याचे सांगितले जाते. यंदाच्या निवडणुकीतही पन्ना प्रमुखांपासून केंद्रीय पातळीवरील कार्यकर्त्यांच्या कामाचे नियोजन ठरलेले आहे. पक्षाने पन्नाप्रमुख, बूथप्रमुख, शक्‍ती प्रमुख आणि मंडल प्रमुख अशी “ग्राऊंड लेवल’ वरील कार्यकर्त्यांची वर्गवारी केली आहे. तीन चार बुथ प्रमुखांमागे एक शक्‍ती प्रमुख नेमण्यात आलेला आहे. तीन चार शक्‍ती प्रमुखांमागे मंडल प्रमुखाची नेमणूक करण्यात आलेली आहे. या मंडल प्रमुखांचे “रिपोर्टींग’ स्थानिक आमदारांकडे देण्यात आलेले आहे.

पक्षाने कार्यकर्त्यांसाठी खास मोबाईल ऍप तयार केले आहे. पक्षाच्या आदेशानुसार केलेली कामे, प्रचारविषयक कामे तसेच पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण केल्यानंतर त्याचे छायाचित्र आणि माहिती या ऍपवर अपलोड करावी लागते. ऍपमुळे वरिष्ठ पातळीवरुन थेट कार्यकर्त्याशी संपर्क साधणे सोपे होते. सध्या कार्यकर्ते त्यांनी केलेल्या कामांची माहिती मोठ्या प्रमाणावर अपलोड करीत आहेत. माहितीची खातरजमा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरुन होत आहे. अशा प्रकारचे फोन मुंबईतून येत असून कार्यकर्त्यांकडे कामाची माहिती विचारली जात आहे.

या बूथ रचनेतील कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या माहितीवरून प्रचाराची दिशा ठरविण्यात येत आहे. त्याप्रमाणे नेते व कार्यकर्त्यांना सुचना देण्यात येत असल्याने उमेदवाराला देखील त्या पद्धतीने प्रचाराचे नियोजन करावे लागत आहे. विशेषतः मतदान घडवून आणण्यासाठी या बूथ रचनेचा वापर केला जाणार आहे. अर्थात यंदा उन्हाची तीव्रता पाहता मतदान कमी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बूथ रचनेतील यंत्रणेचा कस लागणार असल्याचे दिसते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.