सव्वालाख दिव्यांग; मतदार मात्र साडेतेरा हजार

-नगर दक्षिणेत ६ हजार ०७४ दिव्यांगांसाठी सुविधा होणार सज्ज 
-व्हिलचेअरचे ४९१, मॅग्रीफाईग सिट २०३०, सहाय्यक ४०९० तर वाहने १२५

नगर –
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथम दिव्यांगांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात 1 लाख 20 हजार 448 दिव्यांग असतांना मतदार मात्र 13 हजार 484 असल्याचे चित्र समोर आले आहे. मतदार नोंदणी न झाल्याने दिव्यांग मतदारांची संख्या घटली असली तरी आता यापुढे जनजागृती मोहिम जोमाने राबविण्यात येणार असून जास्तीत-जास्त दिव्यांगांची मतदान नोंदणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण व समाजकल्याण विभाग सातत्याने व कायमस्वरूपी यावर काम करणार आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांगांना मतदान प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात 13 हजार 484 दिव्यांगांनी मतदार यादीत आपली नोंद केली. या दिव्यांना मतदानांसाठी सेवा व सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी खास स्वतंत्र यंत्रणा यावेळी उभारण्यात आली आहे. या यंत्रणेने सर्व मतदान केंद्रांची पाहणी करून दिव्यांगांना आवश्‍यक त्या सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्याची र्रव्यवस्था केली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघासाठी येत्या 23 एप्रिलला मतदान होणार आहे. त्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दिव्यांगांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यास त्यांना मतदान करण्यासाठी आवश्‍यक ते सहकार्य करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यासाठी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी नितिन उबाळे यांची जिल्हा दिव्यांग मतदान व्यवस्थापन अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे.

उबाळे यांच्यासह या यंत्रणेत सहभागी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगर दक्षिणेतील 2 हजार 30 मतदान केंद्रांची तपासणी केली आहे. या मतदारसंघात 6 हजार 974 दिव्यांग मतदार आहे. त्यात 1 हजार 183 अंध, 709 कर्णबधीर, 4 हजार 384 अस्थिव्यंग तर 655 इतर दिव्यांग आहेत. त्यांच्यासाठी मतदान केंद्रांवर आवश्‍यक ती सेवा व सुविधा निर्माण करण्यात येत आहे. 1 हजार 240 मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था आहे. जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळा असल्याने त्याठिकाणी रॅम्पची व्यवस्था यापूर्वी करण्यात आली आहे. 491 व्हीलचेअर तर अंध किंवा कमी दृष्टी असलेल्यांसाठी मॅग्नीफाईग सिट 2 हजार 30 ची व्यवस्था करण्यात येणार आहे.

मतदान केंद्र ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहे.त्यांना ही व्यवस्था करण्याची जबाबदारी दिली आहे. ग्रामपंचायतीकडून दरवर्षी दिव्यांगासाठी 5 टक्‍के निधी राखीव ठेवण्यात येतो. त्यातून व्हीलचेअर व मॅग्नीफाईग खरेदी करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अंध व अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी 4 हजार 90 सहाय्यकाची व्यवस्था करण्यात आली असून 125 वाहनांची उपलब्धता करण्यात आली आहे. त्याबरोबर या सर्व मतदान केंद्रावर स्वच्छतागृृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 1 हजार 299 पुरुष व 1 हजार 317 महिला अशी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर मतदानासाठी आलेल्या दिव्यांगांना रांगेत उभे न करता थेट मतदान करता येणार आहे. सध्या असलेल्या दिव्यांग मतदानापैकी 60 टक्‍केपेक्षा जास्त दिव्यांगाचे मतदान घडवून आणण्याचे उद्दीष्टे घेण्यात आले आहे.

सर्वसामन्य मतदाराप्रमाणेच दिव्यांगांना मतदानाचा हक्‍क बजावता आला पाहिजे. त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून त्या दृष्टीने मतदान केंद्रावर सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नितीन उबाळे जिल्हा दिव्यांग मतदान व्यवस्थापन अधिकारी

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.